पुणे : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ही राज्यातील भोंदू बाबांची यादी पोलिसांना देणार आहे. त्यासाठी आपापल्या परिसरातील भोंदू बाबांबद्दल माहिती देण्यासाठी ‘अंनिस’ने हेल्पलाइन सुरू केली आहे.

‘अंनिस’च्या राज्य कार्यकारी समितीच्या सदस्या मुक्ता दाभोलकर, राजीव देशपांडे, गणेश चिंचोले यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. सामान्य नागरिक आणि पीडित व्यक्ती या बुवा बाबांकडून होणाऱ्या शोषणासंदर्भात ‘अंनिस’ कार्यकर्त्यांशी संपर्क साधत असतात. प्रत्येक जिल्ह्यातील शोषणकारी भोंदू बाबांची यादी आणि शक्य असेल तेथे यासंदर्भातील पुरावे ‘अंनिस’चे कार्यकर्ते जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या देणार असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रत्येक पोलीस स्थानकामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्षाची स्थापना करण्याचा शासन निर्णय आहे. हे कक्ष कार्यान्वित करणे आवश्यक आहे. या कक्षाच्या नियमित बैठका झाल्या तर परिसरात चालणारे अघोरी प्रकार वेळीच समोर येतील. या प्रकारांना पायाबंद घालता येईल. सध्या कागदावर असलेले अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष कार्यान्वित करावेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला. याला एक तप उलटून गेले तरीही शासनाने या कायद्याचे नियम तयार केलेले नाहीत. जादूटोणा विरोधी कायद्याचे नियम तयार करून या कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील पोलिसांची जबाबदारी शासनाने अधिक सुस्पष्ट करावी. लोकांच्या मनात भीती उत्पन्न करून त्यांना अघोरी कृत्ये करायला लावणारे अशोक खरात सारखे ज्योतिषी, बाबा, बुवा, मांत्रिक गावोगावी आहेत. ते अशोक खरात एवढे दांडगे बनण्याची वाट न पाहता वेळीच पोलीस हस्तक्षेप करून पायबंद घालण्यासाठी या कायद्याचे नियम तयार झालेच पाहिजेत. या नियमांचा प्रस्तावित मसुदा ‘अंनिस’ने यापूर्वी शासनाकडे दिला होता.

लवकरच पुन्हा एकदा या नियमांचा मसुदा सामाजिक न्याय विभागाला देण्यात येणार असल्याचे ‘अंनिस’ने निवेदनात म्हटले आहे. समाजमाध्यमाद्वारे होणाऱ्या अंधश्रद्धा प्रसाराला अटकाव करणे आवश्यक आहे. या मागण्यांबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र ‘अंनिस’चे राज्य कार्यकारी समिती सदस्य नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, नीता सामंत, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, हमीद दाभोलकर, श्रीपाल ललवाणी यांनी दिली.

भोंदूबाबांची माहिती देण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक

आपापल्या परिसरातील भोंदू बाबांबद्दल माहिती देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यासाठी ९९२२०४८८३२ किंवा ८०८७८७६८०९ या क्रमांकांवर संपर्क साधावा. भोंदूबाबा हे महिलांचे शोषण करत असल्यास ९४२२३०५९२९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारींचे तथ्य तपासून संबंधित यादी ‘अंनिस’कडून पोलिसांना दिली जाणार आहे.