पुणे : ‘सध्या महाराष्ट्रातील एकाही नेत्याला व्हिजन नाही. एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत; मात्र महाराष्ट्रासाठी ‘ब्लू प्रिंट’ सांगू शकेल, असा एकही नेता नाही. पण, अजूनही देवेंद्र फडणवीसांबद्दल आदर वाटतो. या एकट्या माणसाचं चारित्र्य तरी चांगलं आहे. बाकीच्या गोष्टी आपण सोडून देऊ, पण देवेंद्र फडणवीसांकडे निदान एक व्हिजन आहे. त्यांच्याबरोबरचा एकही माणूस मात्र काम करताना दिसत नाही,’ असे परखड मत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी पुण्यातील एका कार्यक्रमात व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पक्षातील आमदारांच्या पात्रतेवरही अंजली दमानिया शंका उपस्थित केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांवर बोलताना दमानिया म्हणाल्या,‘संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी मला बोलावले होते. त्यावेळी शिंदेंना तुमच्या नेत्यांनी, तुमच्या आमदारांनी तोंड उघडले की, त्यांची पात्रता कळते, असे सांगितले होते. कारण, ते संजय बांगर आणि बाकीच्यांकडे बघूनच यांच्याकडे काय ‘व्हिजन’ असणार आणि ते काय देशाला पुढे घेऊन जाणार ? हे राजकारण असेच राहिले, आपण हिंदू-मुस्लिम, अमुक-तमुक करत राहिलो, तर भविष्यात काय होईल, याची चिंता वाटते.’ ‘आता आपल्या सामान्य जनतेला लढावे लागेल. कसे लढायचे हे आपण सगळे मिळून ठरवू,’ अशी सादही अंजली दमानिया यांनी घातली.

सहजीवन व्याख्यानमालेत अंजली दमानिया बोलत होत्या. सहकारनगरच्या मुक्तांगण बालरंजन केंद्रात या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. अंजली दमानिया यांंनी ‘कैफियत सामान्य माणसाची..’ या विषयावर भाष्य केले. या वेळी त्यांंनी महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय परिस्थिती आणि आतापर्यंत मांडलेल्या वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरणही केले.

‘देशात विरोधी पक्ष नाहीत’

‘आता विरोधी पक्ष नाहीत. विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अंबादास दानवे आहेत. सुष्मा अंधारे बरेच विषय मांडतात. काही अगदी टोकाची भूमिका घेतात. पण, बाकी विरोधी पक्षांचे नेते कधी लढताना दिसतात का ?, अशा प्रश्नांचा सरबत्ती करत अंजली दमानिया यांनी सशक्त लोकशाहीसाठी गरजेचा असलेला विरोधी पक्ष नसल्याकडे लक्ष वेधले. ‘आज महाराष्ट्रातल्या घराघरात पक्षांच्या मतभेदावरूनही एकमेकांशी, नातेवाईकांशी कोणी बोलत नाही, मित्रमंडळी एकमेकांशी बोलत नाही. नको, इथे राजकारण, अशीच भूमिका घेतली जाते. पण, राजकारणवर आपण बोललो नाही, तर देश कसा सुधारणार ?,’ असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केला.