पुणे : अक्षरं उलटी दिसतात. लिहता येत नाही. फळ्यावरचं वाचता येत नाही. बाकावर नीट बसता येत नाही. इतर मुलांसारखं राहता येत नाही, म्हणून अनेक विशेष विद्यार्थ्यांसाठी सामान्य शाळांचे दरवाजे बंद होतात. ते उघडून प्रत्येक बालकाला आपापल्या गतीने शिकता यावे, शिक्षणाची समान संधी मिळावी, यासाठी पुण्यातील अंकुर विद्यामंदिर गेली ३८ वर्षे झटते आहे. सामीलकीच्या या ‘अंकुरा’चा झालेला वृक्ष आणखी बहरावा, यासाठी आता शाळेला देणार्‍या हातांची गरज आहे.

कर्णबधिर, अंध, बहुविकलांग, मतिमंद इत्यादी २९ प्रकारच्या अपंगत्वाशी झुंज देणारी विशेष मुले आणि जोडीने सामान्य मुले अंकुर विद्यामंदिरमध्ये एकत्र शिकतात. माधुरी देशपांडे यांनी १९८८ मध्ये ही शाळा सुरू केली. दोन मुलांपासून सुरू झालेला हा शिक्षणप्रवास १२५ विद्यार्थ्यांच्या मुक्कामावर आला. ‘सेंटर फॉर अपॉच्र्युनिटीज इन एज्युकेशन अँड रिहॅबिलिटेशन’ (कोअर) या संस्थेच्या अंतर्गत अंकुर विद्यामंदिर, निर्मिती व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र आणि विशेष मुलांसाठी उत्कर्ष थेरपी सेंटर, फंक्शनल ॲकॅडेमिक्स युनिट आदी विभाग येथे चालतात. इथे प्रवेशासाठी कोणालाही नकार नाही. दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका अमृता जोशी सांगतात, ‘सकाळी नऊ वाजता शाळा भरते. त्यानंतर मैदानी खेळ, अभ्यास, व्यवसायभिमुख प्रशिक्षण अशा उपक्रमांचे सगळे वेळापत्रक चार वाजेपर्यंतचे. सामीलकी हीच संकल्पना, त्यामुळे शाळेलाही भिंती नाहीत. मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार सगळे विषय शिकवले जातात. प्रगतीचे मूल्यमापनही तसेच. त्यामुळे शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होत नाही. उलट, जगण्यासाठीचा आत्मविश्वास मिळतो.’

‘विशेष मुलांसाठी फंक्शनल ॲकॅडेमिक्स युनिट आहे. त्यात भाजी निवडण्यापासून एकट्याने प्रवास करण्यापर्यंतची कौशल्ये शिकवली जातात. विशेष शैक्षणिक गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या-त्या विद्याथ्र्याचे शिक्षक आणि थेरपिस्ट अभ्यासक्रम बदलून देतात. त्यानुसार, त्या विद्यार्थ्यांचे प्रगतिपुस्तक तयार होते. इयत्ता पाचवीपासून पुढे प्रत्येक विद्याथ्र्याला व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते. आकाश कंदील, तोरण, राख्या, रंगकाम, लोणची-चटण्या, शिवणकाम, बागकाम आदी कौशल्ये शिकवली जातात. या शाळेतून बाहेर पडलेली अनेक मतिमंद-विशेष गरजा असलेली मुले आज वेगवेगळ्या क्षेत्रांत नाव कमावत आहेत,’ असे जोशी यांनी नमूद केले.

मदत कशासाठी?

‘शाळेत शिकणार्‍या बहुतांश मुलांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. करोना काळात शाळेची आर्थिक घडी विस्कटली. एका विद्याथ्र्यामागे दरमहा किमान आठ हजार रुपये खर्च येतो. मोजकेच पालक हे पैसे भरू शकतात. शिक्षक, थेरपिस्ट आणि मावश्या तुटपुंज्या पगारावर काम करतात. त्यांची संख्याही आता कमी पडते आहे. आणखी ५ शिक्षकांची गरज आहे. शाळेचे कामकाज चालविण्यासाठी दरमहा ४ लाख रुपयांहून अधिक खर्च येतो. आता हा खर्च भागविणे अवघड झाले आहे. व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र शाळेबाहेरील विद्यार्थ्यांसाठीही खुले करायचे आहे. इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम, पाच स्वच्छतागृहे नव्याने उभारावी लागणार आहेत. त्यासाठी मदतीची गरज आहे,’ असे आवाहन अमृता जोशी यांनी केले.