पुणे : गंभीर आजारांवर मात करून ‘पेडिॲट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट’मधून यशस्वीरीत्या उपचार करण्यात आलेल्या बालरुग्णांचा आणि बालरुग्णांची देखभाल करणाऱ्या प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्याचा ‘अंकुरा हॉस्पिटल फॅार वुमन ॲण्ड चिल्ड्रन’ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जागतिक पेडिॲट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिट जनजागृती आठवडा २ ते ८ मे या कालावधीत जगभरात साजरा करण्यात आला. यानिमित्त पुण्यातील ‘अंकुरा हॉस्पिटल फॅार वुमन ॲण्ड चिल्ड्रन’ यांच्या वतीने ‘देखभाल करणाऱ्यांची देखभाल घेणे’ या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बरे झालेल्या बालकांचा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. चिमुकल्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. जिनिव्हा येथील ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह अँड क्रिटिकल केअर सोसायटीज’च्या शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जंबगी म्हणाले, “पीआयसीयू’मध्ये दाखल होणारी बहुतांश मुलांची प्रकृती गंभीर असते. ते जीवन- मृत्यूशी लढा देत असतात.
या प्रत्येक मुलामागे त्यांच्या भविष्याबाबत भीती, आशा आणि भावनिक ताण सहन करणारे कुटुंबीय खंबीरपणे उभे असतात. जागतिक ‘पीआयसीयू’ जनजागृती सप्ताह हा केवळ वैद्यकीय सेवेचा गौरव नसून, पालक, कुटुंबीय, परिचारिका आणि डॉक्टर यांच्या ताकदीचाही सन्मान आहे. या कार्यक्रमातून या कुटुंबांना तुम्ही एकटे नाहीत, हा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. गंभीर आजारांतून बरे होऊन मुलांना पुन्हा हसताना पाहणे, हीच आमच्यासाठी सर्वांत मोठी प्रेरणा आहे.’
