पिंपरी : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याचे सर्वांना माहिती होते. एकत्र येण्याबाबत गेल्या तीन ते चार महिन्यापासून हालचाली सुरू होत्या. त्याला विरोध नव्हता. याबाबतची माहिती राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही माहिती असेल, असा दावा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) विधिमंडळ पक्षाची दुपारी मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीला जाण्यापूर्वी पिंपरीचे आमदार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार असल्याबाबत सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनाही माहिती असेल असे मला वाटते. याबाबत मागील चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती, असे अण्णा बनसोडे म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आल्यास प्रत्येक कार्यकर्त्याला ऊर्जा मिळेल. महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे सर्वांना माहित होते. त्याला कोणाचा विरोध नव्हता. एकत्र येण्याबाबत गेल्या तीन ते चार महिन्यापासून हालचाली सुरू होत्या, असेही अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून अजून आम्ही सावरलो नाहीत. सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करणे आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही घाई नाही. तांत्रिक अडचण असल्याने लवकर शपथविधी आयोजित करण्यात आला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार शपथविधी पार पडत आहे. महाराष्ट्रात अजितदादांनी साम्राज्य उभे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पदाधिकारी यांची बैठक होईल. या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असेही अण्णा बनसोडे म्हणाले.