जळगाव घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपी राज्याचे माजी मंत्री सुरेश जैन यांच्या विरोधात पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात सुरू असलेला बदनामीचा खटला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी मागे घेतला. यासंबंधी अण्णांनी केलेला विनंती अर्ज न्यायालयाकडून मंजूर करण्यात आला आहे.
अण्णांनी सुरेश जैन यांच्यासंबंधी भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केल्यानंतर ९ आणि १० मे २००३ रोजी सुरेश जैन यांनी पत्रकार परिषद घेऊन अण्णांवर आरोप केले होते. त्यानंतर २४ जून २००३ रोजी अण्णांनी पुणे येथील प्रथम वर्ग न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. गेले १३ वर्षे या खटल्याचे कामकाज सुरू होते. जैन यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांसंबंधी ६ पत्रकारांची साक्ष झाल्यानंतर प्रथमदर्शनी सुरेश जैन यांनी अण्णांची बदनामी केल्याचे सिद्ध होत असल्याचे २१ मार्च २०१३ रोजी न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे या खटल्याच्या अंतिम व महत्त्वाच्य़ा टप्प्यातील कामकाज आता सुरू होणार होते.
या संदर्सभात अण्णांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, सुरेश जैन यांच्या संबंधी भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची विनंती मी सुमारे १३ वर्षांपूर्वी राज्य सरकारला केली होती. त्यानुसार सरकारतर्फे चौकशी होऊन जैन यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आल्याने ते गेल्या ४ वर्षांपासून कारागृहात आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाकडून आरोपीचा जामीन अर्ज वेळोवेळी फेटाळण्यात आला असून, खटला चालविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशा परिस्थितीत वयोवृद्ध झालेले आरोपी जैन हे कारागृहातून बाहेर येण्याची शक्यता दिसत नाही. शिवाय जैन यांनी माझ्या विरोधात जळगाव न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. तो खटला जैन यांनी स्वतःहून काढून घेतलेला आहे. त्यामुळे सध्या जैन यांची माझ्या विरोधात कोणतीही तक्रार नाही. सध्या माझे वय ७८ वर्षे असून वयोमानापरत्वे अधिकचा प्रवास किंवा धावपळ न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे. तसेच राळेगणसिद्धी येथे सातत्याने भेटीसाठी येणारे अभ्यागत व इतर कामांमुळे सदर खटल्याच्या कामासाठी वेळ देणे मला अडचणीचे होत आहे.
अशा परिस्थितीत सुमारे १३ वर्षांपूर्वी आरोपी जैन यांनी माझ्या विरोधात केलेले बेछूट आरोप आणि त्यानंतरच्या घडामोडी पाहता आरोपी जैन यांना न्याय व्यवस्थेकडून योग्य ते प्रायश्चित्त मिळत आहे, अशी माझी धारणा झालेली आहे. आरोपी जैन यांच्याशी माझे कोणतेही वैयक्तिक भांडण किंवा सूडभावना नाही. न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे केलेल्या भ्रष्टाचारासंबंधी जैन यांना न्यायव्यवस्थेकडून योग्य ते शासन होईलच, असा आम्हाला विश्वास आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.