मध्यमवर्गीय कुटुंबातील युवती लष्करी अधिकारी!

अन्नपूर्णा दत्तात्रय बोथाटे या पंचवीसवर्षीय युवतीने लष्करी अधिकारी होण्यासाठी खडतर प्रवास केला.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ध्येयपूर्ती; पहिली नेमणूक कारगिलमध्ये

शहराच्या पूर्वभागातील गुरुवार पेठ म्हणजे गजबजलेला भाग. या भागातील एका जुन्या दगडी वाडय़ात एका खोलीत राहणाऱ्या बोथाटे कुटुंबातील अन्नपूर्णाने पाचवीत असल्यापासून लष्करात अधिकारी व्हायचे स्वप्न बाळगले होते. आई-वडील नोकरी करून संसाराचा गाडा हाकत होते. प्रतिकूल परिस्थितीत अन्नपूर्णाला ध्येयाचा विसर पडला नाही. फिटनेस ट्रेनर, रग्बीपटू असलेल्या अन्नपूर्णाने तिचे ध्येय प्रयत्नपूर्वक गाठले. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमीत खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ती पुण्यात परतली आहे आणि तिची पहिलीच नेमणूक कारगिल येथे झाली आहे.

अन्नपूर्णा दत्तात्रय बोथाटे या पंचवीसवर्षीय युवतीने लष्करी अधिकारी होण्यासाठी खडतर प्रवास केला. गुरुवार पेठेतील राममंदिरानजीक असलेल्या खन्ना वाडय़ात एका खोलीत बोथाटे कुटुंबीय राहायला आहे. अन्नपूर्णाचे वडील दत्तात्रय बोथाटे टाटा मोटर्समध्ये शिपाई होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. आई एसटी महामंडळात लिपिक असून ती सेवानिवृत्त झाली आहे. वडिलांच्या निधनानंतर अन्नपूर्णाला धक्का बसला, मात्र खडतर परिस्थितीवर मात करून तिने तिचे ध्येय गाठले. ध्येयपूर्तीच्या प्रवासाबाबत अन्नपूर्णा ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाली, आम्ही ज्या भागात राहत होतो, त्या भागात तसे शिक्षणाला पोषक वातावरण नव्हते. वडील टाटा मोटर्समध्ये शिपाई होते. त्यांनी आम्हा भावंडांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. सेंट मीराज शाळेतून मी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. सेंट मीराज शाळा लष्कर परिसरात आहे. लष्कराचे दक्षिण मुख्यालय तसेच अनेक लष्करी संस्था या भागात आहेत. त्यामुळे शाळेत जाताना दररोज या भागातून जाणारे लष्करी जवान मी पाहायचे. लष्करी सेवेचे मला लहानपणापासून आकर्षण होते. त्यामुळे तेव्हाच शाळेत मी लष्करी अधिकारी होणार असल्याचे सांगितले. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर मी अकरावीत जाणीवपूर्वक राष्ट्रीय छात्र सेनेत (एनसीसी) प्रवेश केला. तेथील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. लष्करात अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते, याची माहिती घेण्यासाठी मी एकदा आईबरोबर लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात गेले होते. खेळाची सुरुवातीपासून आवड होती. महाविद्यालयात असताना मी रग्बी संघात प्रवेश घेतला. २०१० मध्ये मी देशाकडून आंतरराष्ट्रीय रग्बी स्पर्धेत सहभागी झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असताना मी अ‍ॅपेक्स करीअरचे प्रदीप ब्राह्मणकर यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. कुटुंबाला मदत होण्यासाठी मी एका व्यायामशाळेत फिटनेस ट्रेनर म्हणून काम केले. सव्‍‌र्हिस सिलेक्शन बोर्डच्या (एसएसबी) माध्यमातून मी लष्करात दाखल होण्यासाठी परीक्षा देण्यास सुरुवात केली. पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आले आणि अखेर तिसऱ्या प्रयत्नात मी यशस्वी झाले. या परीक्षेत मी देशात तिसरी आले.

संघर्षांचे बाळकडू 

सामान्य मध्यमवर्गीय कु टुंबात मी वाढले. वडिलांनी सुरुवातीपासून आम्हा भावंडांना कठीण प्रसंगांना घाबरायचे नाही, अशी शिकवण दिली. वडिलांच्या निधनानंतर मी हार मानली नाही. लष्करी अधिकारी व्हायचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जात ते पूर्ण केले. मोठय़ा बहिणीच्या विवाहानंतर कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी नोकरी करावी लागली. नोकरी करून शिक्षणाचा खर्च भागवला. चेन्नईतील ऑफिसर्स अ‍ॅकॅडमीत  खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मी लेफ्टनंट झाले. काही दिवसांसाठी मी पुण्यात आले आहे. माझी पहिली नेमणूक कारगिल येथे झाली आहे. संघर्षांचे बाळकडू सुरुवातीपासून मिळाल्याने खडतर प्रसंगात हार मानायची नाही. लढाऊबाणा कायम जपायचा, अशी भावना अन्नपूर्णाने व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Annapurna bothate become military officer