रायगडाला नव वैभवाची झळाळी लाभणार

या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोल्हापूर गादीचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

किल्ले रायगड प्राधिकरणाची घोषणा; युवराज संभाजीराजे अध्यक्षपदी

केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या जाचक अटी आणि निधीची चणचण या अडचणींचा दुर्गपंढरी रायगडाला पडलेला वेढा आता उठणार असून, गडाला पुनर्वैभव मिळवून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने नुकतीच किल्ले रायगड प्राधिकरणाची घोषणा केली असून या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोल्हापूर गादीचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यभरातील इतिहास अभ्यासक, संशोधक आणि शिवभक्तांच्या सहकार्याने रायगड संवर्धन करून गडाला पुनर्वैभव मिळवून देणार असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. रायगडाशी संबंधित कामांसाठी प्राधिकरणाला विशेष अधिकार देण्यात आल्यामुळे रायगडाच्या जतन संवर्धनाचा मार्ग अधिक सुकर आणि प्रशस्त झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभागातर्फे रायगड आणि परिसराच्या पर्यटन विकास आराखडय़ाला नुकतीच मान्यता देण्यात आली. हा आराखडा बनवताना रायगडाचे जतन, संवर्धन आणि गडपण पणाला लागू नये, अशी दुर्गप्रेमींची अपेक्षा होती. त्याचा पाठपुरावाही संभाजीराजे यांच्याकडे तसेच त्यांच्यामार्फत सरकारकडे सुरू होता. या पाश्र्वभूमीवर रायगड प्राधिकरणाची घोषणा झाल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती या प्राधिकरणाचे अध्यक्ष असून, कोकणचे विभागीय आयुक्त, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक, रायगड जिल्हाधिकारी, सेवानिवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण पश्चिम विभागाचे प्रादेशिक संचालक, राज्य पुरातत्त्व संचालनालयाचे संचालक, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमटीडीसीचे अधीक्षक आणि कार्यकारी अभियंता हे या प्राधिकरणाचे सदस्य आहेत. रायगड प्राधिकरणावर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे उपाध्यक्ष आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, सुधीर थोरात, जयसिंगराव पवार, कोल्हापूरचे दुर्गअभ्यासक भगवान चिले आणि राम यादव यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Announcement of the raigad fort authority raigad fort development