पुणे : तापमानाच्या नोंदी सुरू झाल्याच्या १२० वर्षांच्या कालावधीत २०२१ हे वर्ष देशातील पाचवे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. या वर्षांत देशातील जमिनीलगतचे वार्षिक तापमान सरासरीच्या तुलनेत ०.४४ अंश सेल्सिअसने अधिक होते. यापूर्वी चार वेळा सर्वाधिक वार्षिक तापमानाची नोंद झाली आहे. आता त्यात पाचव्या वर्षांची भर पडली असून, या पाच वर्षांमध्ये २०१६ मध्ये आजवरच्या सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने २०२१ मधील तापमान आणि पावसाच्या हंगामाबाबत भाष्य करणारा अहवाल जाहीर केला असून, त्यात याबाबतची माहिती नोंदविण्यात आली आहे. जागतिक तापमानवाढीचे परिणाम गेल्या काही वर्षांमध्ये भारतातही दिसून येत असून, १९९७ पासून देशातील तापमान कमी-अधिक प्रमाणात सरासरीच्या तुलनेत वाढलेलेच दिसून येत आहे. गेल्या सुमारे २५ वर्षांच्या कालावधीत एकदाही वार्षिक तापमान सरासरीच्या खाली नोंदविले गेले नसल्याचे १९०१ पासूनच्या तापमानाच्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे. भारतीय हवामान विभागाकडून सध्या १९८१ ते २०१० या कालावधीतील तापमान लक्षात घेऊन त्याची सरासरी काढण्यात आली आहे. त्यानुसार २०२१ या वर्षांत तापमान सरासरीच्या पुढे होते आणि ते आजवरच्या नोंदीतील पाचवे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. आजपर्यंत २००८, २००९, २०१६ आणि २०१७ या वर्षांत सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर वाढीव तापमानाच्या पाचव्या स्थानावर २०२१ हे वर्ष आहे. या वर्षांत देशात वार्षिक सरासरी तापमान सरासरीच्या तुलनेत ०.४४ अंश सेल्सिअसने अधिक होते. मात्र, ते २०१६ या वर्षांच्या तुलनेत कमी होते. आजवरच्या नोंदींमध्ये उष्ण वर्ष म्हणून पाच वर्षांच्या यादीत सर्वात वर असलेल्या २०१६ मध्ये देशातील तापमान सरासरीच्या तुलनेत ०.७१ अंश सेल्सिअसने अधिक होते.
थंडीच्या कालावधीतच तापमानवाढीत भर
२०२१ या वर्षांमधील तापमानवाढीत थंडीचा कालावधी आणि पावसाच्या हंगामानंतरच्या दिवसांचा वाटा मोठा असल्याचे दिसून येते. जानेवारी आणि फेब्रुवारी या थंडीच्या कालावधीत तापमानात ०.७८ अंश सेल्सिअसची वाढ होती. मोसमी पावसाच्या हंगामानंतरचा थंडीचाच कालावधी असलेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत तापमानात ०.४२ अंश सेल्सिअसची वाढ होती. याच कारणांनी वार्षिक तापमानाच्या सरासरीत वाढ नोंदविली गेली.