पुनर्वसनात मिळालेल्या शेतजमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर शेऱ्याची नोंद करण्यासाठी एकाकडून पाच हजार रुपयांची लाच घेणाऱ्या दौंड तहसील कार्यालयातील महसूल सहायकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.

हेही वाचा >>> पुणे : सिंहगड रस्त्याच्या पर्यायी मार्गाला पोलिसांचा अडसर ; महापालिका-वाहतूक पोलिसांमध्ये वाद , रस्त्याचा वापर नाही

तुषार वसंतराव शिंदे (वय ३४) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत एकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारादांना पुनर्वसनात वाटप झालेल्या शेत जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरील भोगवटा वर्ग २ शेरा कमी करुन भोगवटा वर्ग १ शेऱ्याची नोंद करायची होती. त्यासाठी शिंदे यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत तक्रार केल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. शेतकऱ्याकडून लाच घेताना शिंदे याला पकडण्यात आले.पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे तपास करत आहेत.