पुणे : शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या भोसरीतील गुंडाला खंडणी विरोधी पथकाने पकडले. शास्त्री रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मुसा उर्फ मुसेफ वजीर थोरपे (वय २२, रा. नूरमौहल्ला गल्ली, दिघी रस्ता, भोसरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार अमोल आव्हाड, मयूर भोकरे शास्त्री रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी भोसरीतील तडीपार गुंड मुसा थोरपे एका पानपट्टीजवळ थांबल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.
तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी थोरपेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.थोरपेला पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फाैजदार रवींद्र फुलपगारे, अमोल आवाड. लहू सूर्यवंशी, मयूर भोकरे यांनी ही कारवाई केली. शहरातून तडीपार करण्यात आलेले गुंड आदेशाचा भंग करुन शहरात वास्तव्य करत असल्याचे दिसून आले आहे.