पुणे : पुण्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी दोन टोळीच्या वर्चस्वातून गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी पिंपरी- चिंचवडच्या गुंडाविरोधी पथकाने हवेत गोळीबार करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या दोन कारवाईत चार गावठी पिस्तुल आणि सहा जिवंत काडतुसे असे एकूण सात पिस्तुल आणि १४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

२० जून रोजी तळेगाव दाभाडे या ठिकाणी रात्री साडेआठच्या सुमारास चिक्या शिंदे टोळीने हैदोस घालत हवेत गोळीबार केला होता. सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नव्हतं. या घटनेनंतर तळेगाव परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती. टोळी प्रमुख रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे, नीरज उर्फ दादया बाबू पवार आणि आदित्य नितीन भाईनल्लू अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.

आणखी वाचा-वैद्यकीय तपासणीसाठी पबमधील दहा तरुणांचे रक्ताचे नमुने घेतले; न्यायवैद्यकीय शास्त्र पथकाकडून पबची तपासणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा ठाकूर टोळी आणि चिक्या शिंदे टोळीत वर्चस्वातून नेहमीच वाद होतात. २० जून रोजी रात्री आठच्या सुमारास. दोन्ही टोळ्यांमध्ये कोणामध्ये किती ताकद आहे? हे आजमावण्यासाठी थेट चौकात बोलवण्यात आलं. मात्र बाबा ठाकूर टोळी समोर आली नाही. चिक्या शिंदेच्या टोळीने दोन दुचाकीवरून येऊन परिसरात दहशत माजवत विविध ठिकाणी चार ते पाच राउंड हवेत झाडले. यामुळे तळेगाव दाभाडेमध्ये एकच खळबळ उडाली होती. नागरिकांमध्ये भीतीच वातावरण होतं. अखेर या टोळीतील तिघांना गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. चिक्या शिंदे याच्यावर हत्या केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे.

तिन्ही सराईत गुन्हेगारांना अटक केल्यानंतर तळेगावमध्ये या तिन्ही गुंडांची पोलिसांनी धिंड काढली आहे. तळेगाव दाभाडे हे शहर अत्यंत संवेदनशील बनले असून या ठिकाणी पोलिसांनी अधिक करडी नजर ठेवणे गरजेचे आहे. या आधी देखील कायद्यासुवस्थेच्या बाबतीत तळेगाव मध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत हे नाकारू शकत नाहीत.