पिंपरी- चिंचवड : पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मालमत्ता विरोधी पथकाने पिस्तूल विक्री आणि दहशत पसरविण्यासाठी पिस्तुलाचा वापर करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून पाच पिस्तुल आणि वीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तीन ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून एकावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. उमेश चंद्रकांत केदारी, मंथन उर्फ गुड्डू अशोक सातकर आणि विशाल ज्योतिराम खानेकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई गणेश सावंत, सुमित देवकर आणि विनोद वीर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली. तळेगाव दाभाडे परिसरात तीन अज्ञात व्यक्ती चार चाकी गाडीतून फिरत आहेत. त्याच्या जवळ पिस्तुल आहे. मालमत्ता विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विजय ढमाल यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पथकाने अज्ञात व्यक्तींना ताब्यात घेतलं. उमेश चंद्रकांत केदारी, मंथन उर्फ गुड्डू अशोक सातकर आणि विशाल ज्योतिराम खानेकर यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे ८ लाख ५६ हजारांची ५ पिस्तुले आणि २० जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. याप्रकरणी तळेगाव पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दहशत माजवण्याकरिता आणि तीन पिस्तुल विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. हे पिस्तुल मध्यप्रदेशमधील बर्नाळा येथून आणल्याच समोर आलं आहे. उमेश केदारी याच्यावर हत्येच्या गुन्ह्यासह चार गुन्हे दाखल आहेत. मंथन याच्यावर हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यासह एकूण तीन तर विशाल खानेकर याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.