पुणे : जादा पैसे मिळवण्याच्या लोभापायी सायबर चोरट्यांना बँक खाते वापरास दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापकासह तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला एक आरोपी मूळचा राजस्थानचा आहे. त्याने पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकास स्कॅनर पाठविण्यास सांगितले होते. त्याद्वारे तो पंपाच्या बँक खात्यात सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातील रक्कम जमा करत होता. त्यानंतर गुलटेकडी भागात राहणारा एक आरोपी हा पंपावर यायचा. खात्यात पैसे जमा झाले का ? अशी विचारणा करायचा. पंपावरील व्यवस्थापक मोबाइलवरील ॲपद्वारे हे व्यवहार तपासत होता.

रक्कम जमा झाल्यानंतर पंपावर जमा झालेली रोख रक्कम ही आरोपींना दिली जात होती. या व्यवहारासाठी दहा हजार रुपयांमागे २०० रुपये अतिरिक्त मिळत (कमिशन) होते. त्यापैकी ५० रुपये पंपावरील व्यवस्थापक स्वत:कडे ठेवायचा. उर्वरित १५० रुपये तो पंपावरील कामगारांना वाटत होता.

पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने बाजार समितीच्या पेट्रोल पंपाच्या बँक खात्यात सायबर फसवणुकीतील सात लाख १० हजार १३ रुपये स्वीकारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मार्केट यार्ड पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

चेन्नई सायबर पोलिसांच्या तपासात उघड

चेन्नई सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात सायबर चोरट्यांनी पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पेट्रोल पंपाच्या बँक खात्यात पैसे जमा केल्याचे उघड झाले होते. त्यानंतर चेन्नई पोलिसांनी संबंधित बँकेकडे विनंती केल्यानंतर खाते गाेठविण्यात आले. या प्रकरणातील फिर्यादी हे बाजार समितीचे कर्मचारी आहेत. ते बँकेत व्यवहार करण्यासाठी गेले. तेव्हा बँक खाते गोठविण्यात आले असून, या खात्याचा वापर सायबर चोरट्यांनी फसवणुकीतील रक्कम जमा करण्यासाठी केल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

सायबर चोरट्यांकडून तरुणाची १५ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून तरुणाची १५ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका तरुणाने फिर्याद दिली असून, हडपसर पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० वर्षीय तरुण हडपसर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर १३ फेब्रुवारी रोजी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने उत्पादनांची खरेदी-विक्री व्यवहारात चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाला एक लिंक पाठविली. या लिंकमध्ये तरुणाला त्याची माहिती देण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात तरुणाने गेल्या दीड महिन्यात वेळोवेळी १५ लाख ३१ हजार रुपये जमा केले.

पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला नाही. चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर तरुणाने संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.