पुणे : राज्यातील ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती आता ऑनलाइन नोंदवली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅपची निर्मिती केली जाणार आहे.

सामाजिक न्याय विभागामार्फत ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ऑफलाइन पद्धतीने ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र ऊसतोड कामगारांची माहिती अचूक आणि अद्ययावत असण्यासाठी संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅपची निर्मिती, संकेतस्थळ आणि अ‍ॅपद्वारे ऊसतोड कामगारांची नोंदणी करण्याचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र राज्य माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाकडे (महाआयटी) संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅपचे काम देण्यात आले आहे. त्यासाठी महाआयटीला सुमारे २८ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अ‍ॅप आणि संकेतस्थळ मराठी, इंग्रजी भाषेत तयार केले जाईल, विकसित केलेल्या प्रणालीचे सुरक्षा लेखापरीक्षण (सिक्युरिटी ऑडिट) करणे, संकेतस्थळ आणि अ‍ॅपचे मालकी हक्क सामाजिक न्याय विभागाकडे असतील आदी अन्य तांत्रिक सूचना शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.