महापालिकेतर्फे आयोजित केली जाणारी महापौर चषक कुस्ती स्पर्धा आपापल्या प्रभागात पळवण्याचा प्रयत्न सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुरू केला असून या स्पर्धेचे आयोजन करण्याची तयारी राष्ट्रीय तालीम संघानेही दाखवली आहे. या मान्यताप्राप्त संघाला स्पर्धा आयोजनाची संधी महापालिका देणार, का पुन्हा एकदा पुण्यात राष्ट्रवादी कुस्ती स्पर्धा होणार याकडे आता लक्ष लागले आहे.
महापालिकेने गेल्या वर्षी भरवलेली कुस्ती स्पर्धा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून चांगलीच गाजली होती. या स्पर्धेत महापालिका प्रशासन आणि काही नगरसेवकांनी अनेक नियमबाह्य़ गोष्टी केल्या होत्या. लवकरच दुसरी महापौर कुस्ती स्पर्धा भरवली जाणार असून या स्पर्धेसाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नगरेसवक सचिन दोडके यांनी ही स्पर्धा वारजे येथे भरवावी यासाठी, तर त्याच पक्षाचे नगरसेवक महेंद्र पठारे व अन्य चार-पाच नगरसेवकांनी ही स्पर्धा खराडी येथे भरवावी, असे प्रस्ताव दिले आहेत. त्यामुळे स्पर्धेबाबत राष्ट्रवादीमध्येच कुस्ती सुरू झाल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता असलेली एकमेव संघटना म्हणून ओळख असलेली तसेच शहरातील सर्व तालमींचे आणि वस्तादांचे प्रतिनिधित्व करणारी ‘राष्ट्रीय तालीम संघ’ ही पन्नास वर्षांची जुनी संस्था असून या संस्थेनेही मंगळवारी महापौरांना स्पर्धेबाबत पत्र दिले. संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, विश्वस्त गुलाबराव सोनावणे, सहसचिव गोरखनाथ भिकुले आणि बुवाजी लिमण या वेळी उपस्थित होते. मंगळवार पेठ येथे मध्यवर्ती भागात असलेल्या छत्रपती शिवाजी आखाडय़ामध्ये महापौर चषक कुस्ती स्पर्धा भरवण्याची तयारी संघाने दाखवली आहे.
आमची संस्था गेली पन्नास वर्षे कुस्ती या भारतीय खेळाचा प्रचार व प्रसार करत आहे. शिवाजी आखाडा येथे स्पर्धा झाल्यास पुण्यातील कुस्तीप्रेमींना मध्यवर्ती भागात चांगल्या कुस्त्या बघण्याची संधी उपलब्ध होईल, असे महापौरांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शिवाजी आखाडय़ातच स्पर्धा भरवा- काँग्रेस
मंगळवार पेठ येथील छत्रपती शिवाजी आखाडा ही वास्तू कुस्ती स्पर्धासाठीच बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे ही स्पर्धा तेथेच झाली पाहिजे, असे पत्र काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे, सुधीर जानजोत यांनी महापौरांना दिले आहे. या निमित्ताने त्या वास्तूची देखभाल-दुरुस्ती होईल व वास्तू चांगल्या स्वरूपात उभी राहील, असे या पत्रात नमूद करण्यात आले असून तसा ठरावही काँग्रेसने क्रीडा समितीला दिला आहे.