आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुनर्विचार करावा आणि राष्ट्रवादीची उमेदवारी स्वीकारावी, असे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केलेले आवाहन, अन्य उमेदवार नसल्यास आपणच मावळातून लढू, त्यासाठी ‘साहेबां’ कडे वशिला लावण्याची प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांची गमतीदार कोटी आणि रिंगणात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार लढणारच, अशी घोषणा करूनही उपमुख्यमंत्र्यांनी गुलदस्त्याच ठेवलेले उमेदवाराचे नाव, यामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेली संभ्रमावस्था दूर न होता आणखी वाढली आहे.
मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून पक्षात असलेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी अजित पवार व प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या उपस्थितीत थेरगावात राष्ट्रवादीचा मेळावा झाला, तेव्हा ते बोलत होते. शहराध्यक्ष योगेश बहल, आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर राजू मिसाळ, माजी मंत्री मदन बाफना, माजी महापौर संजोग वाघेरे, वसंत वाणी, अपर्णा डोके, माऊली दाभाडे, बापू भेगडे, बाळासाहेब नेवाळे, गणेश खांडगे, बबन भेगडे, मिकी कोचर आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, मावळच्या उमेदवारीची संभ्रमावस्था दूर करण्याची मागणी अनेकांनी आपल्याकडे केली. कोणत्याही परिस्थितीत मावळमध्ये राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार िरगणार राहणार आहे, त्याचेच काम सर्वानी करायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी डोक्यातून गैरसमज काढून टाकावा. ‘डमी’ उमेदवार असणार नाही. मी सभेपुरतो बोललो, माझा छुपा पािठबा आहे, असे काहीही होणार नाही. मात्र, पक्ष कार्यकर्त्यांनी तोंड दाखवण्यापुरते काम करू नये. अधिकृत उमेदवाराचा प्रचार करायचा आहे. सकाळी एक आणि रात्री एक असा दुहेरी प्रचार करायचा नाही, असे त्यांनी बजावले. उमेदवारीचा घोळ पाहून भास्कर जाधव म्हणाले, स्थानिक नेत्यांनी वशिला लावल्यास मीच लढतो. या भागात कोकणची खूप माणसे आहेत. बहल म्हणाले, शिवसेनेत तिकीट विकले गेले, राष्ट्रवादीत तसे होत नाही. सर्वानी लक्ष्मण जगताप यांचे एकटय़ाचे नाव दिले. मात्र, ते तयार नाहीत. अजूनही  वेळ गेली नाही, त्यांनी पक्षाचे तिकीट घ्यावे, मतविभाजन झाल्यास विरोधकांचा फायदा होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
 
जगतापांनी पक्षाची उमेदवारी स्वीकारण्याचा आग्रह
अजित पवार यांनी मेळाव्यात भाषण केल्यानंतरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम होते. आमची फरफट होऊ नये, यासाठी लक्ष्मण जगताप यांनीच पक्षाची उमेदवारी स्वीकारावी, असा नगरसेवकांचा आग्रह आहे. तशी भूमिका शहराध्यक्ष योगेश बहल यांनी मांडली. संपूर्ण मेळाव्यात भास्कर जाधव अथवा अजितदादांनी जगताप यांच्यावर टीका केली नाही. त्यामुळे संभ्रम दूर करण्यासाठी राष्ट्रवादीने मेळावा घेतला तरी त्यांचा हेतू मात्र सफल झाला नाही.