पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशांसाठीचे वेळापत्रक प्राथमिक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार पालकांना १ फेब्रुवारीपासून प्रवेश अर्ज भरता येणार असून, मार्चमध्ये प्रवेशांसाठीची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षांत आटीईअंतर्गत  ९६ हजार जागा उपलब्ध होत्या. त्यातील २५ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेबाबत प्राथमिक शिक्षण विभागातर्फे माहिती देण्यात आली. एनआयसीतर्फे आरटीई प्रवेशपात्र २०२१-२२च्या ऑटो फॉरवर्ड केलेल्या शाळांच्या तपासणीसाठी २८ डिसेंबर ते १७ जानेवारीपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास या कालावधीत वाढ करण्यात येईल. पालकांना १ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येईल. ८ मार्च किंवा ९ मार्च रोजी प्रवेशासाठीची सोडत काढण्यात येईल.

सोडतीद्वारे प्रवेश मिळवलेल्या निवडयादीतील पालकांना शाळेत जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी लागेल. तसेच तात्पुरता प्रवेश घ्यावा लागेल. त्यासाठी १० ते ३१ मार्चची मुदत देण्यात आली आहे. वेळापत्रकात आवश्यकतेनुसार संचालनालय स्तरावरून बदल करण्यात येतील. प्रवेशासाठीची सोडत एकदाच काढण्यात येणार असून शाळेच्या रिक्त जागेच्या संख्येइतकीच निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाणार आहे. असे प्राथमिक शिक्षण सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.