महापालिकेच्या विविध वास्तुंच्या संरक्षणासाठी कंत्राटी सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या दोन कंपन्यांच्या निविदांना महापालिकेने मंजुरी दिली आहे.महापालिकेच्या मुख्य इमारतीसह, क्षेत्रीय कार्यालये, आरोग्य केंद्र, दवाखाने, जलकेंद्रे, सांस्कृतिक केंद्रे, क्रीडांगणे, स्मशानभूमी, मंडई, माध्यमिक शाळा, कचरा हस्तांतरण केंद्र, मैलापाणी प्रक्रिया प्रकल्प, उद्याने, वसतिगृह आदींसह विविध वास्तूंच्या ठिकाणी सुरक्षा पुरवण्यासाठी खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून १ हजार ६४० सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत.सध्या हे काम भाजपच्या एका बड्या नेत्याच्या कंपनीकडे आहे. मात्र, या कंपनीने वर्षभरात सुरक्षारक्षकांचे वेतन दिले नसल्याच्या तक्रारी सातत्याने करण्यात आल्या होत्या.
हेही वाचा >>>माहिती अधिकारासाठी… ‘चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला’; दोन रुपयांचे शुल्क कळविण्यासाठी टपालाचा खर्च
त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून कंत्राटी पद्धतीने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये दोन कंपन्या पात्र ठरल्या त्यानुसार ४४ कोटी ९७ लाख ७१ हजार रुपयांच्या निविदा स्थायी समितीने मंजुर केल्या आहेत.महापालिका कंत्राटी पध्दतीने सुरक्षारक्षक नेमत असताना, महापालिका सेवेतील कायमस्वरूपी सुरक्षारक्षक यांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. सध्या महापालिकेच्या सुरक्षा यंत्रणेत केवळ ३५० कायमस्वरूपी सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. सुरक्षा विभागाकडे एकूण ६५० सुरक्षा रक्षकांच्या जागा मान्य असून, यापैकी ३०० जागा रिक्त आहेत.