पुणे : अपिलीय न्यायाधिकरण (APTEL) खासगी वीज कंपन्यांना झुकते माप देत असल्याचा आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना लिहिल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायाधिकरणाने राज्य वीज नियामक आयोगाचे (MERC) सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष यांना समन्स बजावले आहे. न्यायाधिकरणाने संकेतस्थळावर या संबंधीच्या आदेशाची प्रत प्रसिद्ध केली आह
पॉवर कंपनी ऑफ कर्नाटका विरुद्ध राज्य वीज नियामक आयोग आणि इतर या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती वीरेंद्र भट आणि तांत्रिक सदस्य अजय तळेगावकर यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण आणि राज्य वीज नियामक आयोगाशी (एमीईआरसी) संबंधित एका अपिलासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अपिलीय न्यायाधिकरण खासगी कंपन्यांना झुकते माप देत असल्याचा आरोप केला होता. तसेच, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ‘एमईआरसी’च्या बाजूने युक्तिवाद करताना अपिलात काय सुरू आहे, हे तपासण्याची मागणी सरन्यायाधीशांकडे केली होती.
या पार्श्वभूमीवर, अपिलीय न्यायाधिकरणाने ‘एमईआरसी’चे सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना समन्स बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपूर्वी प्रतिज्ञापत्र दाखल करावे किंवा सुनावणीच्या दिवशी प्रतिज्ञापत्रासह प्रत्यक्ष उपस्थित राहून बाजू मांडण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत.
‘महाराष्ट्र वीज नियामक आयोग आणि महावितरणशी संबंधित विधाने न्यायाधिकरणाचा अवमान करणारी आणि या न्यायाधिकरणावर त्यांचा विश्वास नसल्याचे दर्शवणारी होती. त्याची दखल घेऊन न्यायाधिकरणाने ‘एमईआरसी’ आणि महावितरणशी संबंधित अपिलांवर सुनावणी घेणे तात्पुरते बंद केले. वारंवार आदेश देऊनही या दोन्ही संस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. हे अनाकलनीय असून, त्यावर एमईआरसी आणि महावितरणने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे,’ असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले आहे.
अधिकारी-मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद नाही
दरम्यान, या संदर्भात महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. तसेच, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सचिवांशी संपर्क साधला असता,‘अधिक माहितीनंतर प्रतिसाद देऊ,’ असे स्पष्टीकरण दिले.
पार्श्वभूमी काय?
‘महावितरण’ने एका खासगी कंपनीबरोबर वीज खरेदी करार केला होता. मात्र, केंद्र सरकारच्या कोळसा खरेदीसंदर्भातील एका निर्देशामुळे विजेची किंमत वाढली. ही महागडी वीज विकत घेण्यास ‘महावितरण’ने नकार दिला. त्याविरोधात निकाल देऊन राज्य वीज नियामक आयोगाने ‘महावितरण’ला वीजेच्या खरेदीपोटी सुमारे ५५० कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले. हा निकाल अपिलातही कायम राहिला. सर्वोच्च न्यायालयानेही अपिलाचा निकाल कायम ठेवून, अंमलबजावणीच्या सूचना दिल्या. मात्र, नंतर वीज नियामक आयोगाने आपल्याच निर्णयासंदर्भात फेरविचार करणार असल्याचे सांगितले. हा फेरविचाराचा निर्णय नियमबाह्य असल्याचा आदेश अपिलीय न्यायाधिकरणाने दिला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पंतप्रधानांकडे पत्र लिहून अपिलात खासगी कंपन्यांना झुकते माप देण्यात येत असल्याचा आरोप केला. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांकडे तक्रार केली.
