केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीआटी) दिलेल्या उमेदवारांना राज्यातील अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी (टेट) संधी देण्याचा निर्णय राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करता येणार असून, अभियोग्यता चाचणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी ही माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. सीटीईटीचा निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. हा निकाल अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीनंतर म्हणजे ८ फेब्रुवारीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीटीईटीच्या उमेदवारांना संधी मिळण्यासाठी त्यांना अभियोग्यता चाचणीसाठी अर्ज करण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र संबंधित उमेदवारांचा सीटीईटीचा निकाल विचारात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा >>> “दादा, मी राजीनामा दिलेला आहे, तो माझा…”,अजित पवारांनी दिली बाळासाहेब थोरातांच्या फोनची माहिती
अभियोग्यता चाचणीच्या अर्जांसाठी कमी कालावधी उपलब्ध आहे. मात्र उमेदवारांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे मिळण्यास काही काळ लागणार असल्याने उमेदवारांना कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेण्यात आला. आता उमेदवारांना ३१ मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करता येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अभियोग्यताधारक मानसिक दडपणाखाली
राज्यात २०१९मध्ये सुरू झालेली शिक्षक भरती प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अभियोग्यताधारक मानसिक दडपणाखाली आहेत. ही बाब विचारात घेऊन फेब्रुवारी-मार्चमध्ये नियोजित अभियोग्यता चाचणी कोणत्याही कारणास्तव पुढे ढकलण्यात येऊ नये. जेणेकरून भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राहुल कवठेकर यांनी केली.