एखाद्याला डोक्यावर घेतले की मग त्याच्यासाठी वाट्टेल ते करण्यास तरुणाई तयार असते. वेळप्रसंगी त्याच्यासाठी मार खाण्यासही मागेपुढे बघितले जात नाही. असाच अनुभव सध्या ‘सैराट’फेम ‘आर्ची’ आणि ‘परश्या’च्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना येतो आहे. ते जिथे जिथे जातात तिथे तिथे त्यांना बघण्यासाठी तरुणाई बेभान होते आणि मग कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन आयोजकच अडचणीत येतात. भोसरीमध्येही गुरुवारी याचाच प्रत्यय आला. दहीहंडीनिमित्त आयोजकांनी आर्ची आणि परश्याला निमंत्रित केले होते. पण या दोघांना बघण्यासाठी कार्यक्रमस्थळी इतकी गर्दी झाली की गर्दीला आवरण्यासाठी उपस्थितांना लाथा-बुक्क्यांचा ‘प्रसाद’ द्यावा लागला. एवढं करूनही परिस्थिती नियंत्रणात न आल्याने अखेर आर्ची आणि परश्याने अवघ्या काही मिनिटांत कार्यक्रमातून काढता पाय घेणेच पसंद केले.
भोसरीमध्ये आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवामध्ये आर्ची अर्थात रिंकू राजगुरू आणि परश्या अर्थात आकाश ठोसर यांना निमंत्रित करण्यात आले होते. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास या दोघांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. पण त्यांना व्यासपीठापर्यंत आणण्यात आणि परत तेथून बाहेर नेण्यात आयोजकांचीच दमछाक झाली. या दोघांना बघण्यासाठी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी झाल्याने गर्दीला आवरण्यासाठी काही उत्स्फुर्त स्वयंसेवकांनी अनेकांना लाथा-बुक्क्यांचा ‘प्रसाद’ दिला. पण हा ‘प्रसाद’ खाऊनही तेथून कोणीही हटण्यास तयार नव्हते. अखेर आयोजकांनी बाऊन्सर्सच्या मदतीने आर्ची आणि परश्या या दोघांना कसेबसे सुखरुपपणे तिथून बाहेर आणले आणि तेही लगेचच पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले.
काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील विट्यामध्येही एका उदघाटनाच्या कार्यक्रमासाठी रिंकू राजगुरुला बोलावण्यात आले होते. त्यावेळीही तरुणाईने गर्दी केल्यामुळे गुहागर विजापूर हा राज्य महामार्ग काही तासांसाठी ठप्प झाला होता. या गर्दीचा फायदा घेत एका बॅंक कर्मचाऱ्याचे अडीच लाख रुपयेही चोरट्यांनी पळवले होते. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे दोघेही खासगी कार्यक्रमांसाठी जिथे जिथे जात आहेत, तिथे तिथे गर्दी होत असल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे.

‘Archie’ Effect – Lathi charge to control crowd… by Loksatta1