पुणे : अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या ध्रुवीय प्रदेशातील पाऱ्याच्या रासायनिक स्वरूपाबाबत महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढण्यात आले आहेत. शास्त्रज्ञांनी प्रथमच ‘मास स्पेक्टोमेट्री’ तंत्राचा वापर करून केलेल्या मोजमापामध्ये ‘मर्क्युरी ब्रोमाइड’ हे संयुग अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात आढळले आहे. आतापर्यंतच्या बहुतांश वैज्ञानिक प्रारूपांमध्ये ‘मर्क्युरी क्लोराइड’ हेच या प्रदेशातील वातावरणातील प्रमुख संयुग असल्याचे गृहीत धरले जात होते. त्यामुळे प्रचलित गृहीतकांना छेद गेला असून, त्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या गटाने केलेल्या या संशोधनात पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेतील (आयआयटीएम) अनुप महाजन यांचा समावेश होता. ‘नेचर कम्युनिकेशन्स’ या प्रतिष्ठित संशोधनपत्रिकेत याबाबतचा शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध झाला. दीर्घ काळ टिकणारा पारा हा रासायनिक घटक मानवी आरोग्यासाठी घातक प्रदूषक मानला जातो. विशेषतः ध्रुवीय प्रदेशांमध्ये मासे खाण्याचे प्रमाण अधिक असल्याने पाऱ्याचा मानवी शरीरात प्रवेश होण्याचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर, पाऱ्याचे वातावरणातील रूपांतर आणि साठवण यांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
मात्र, आतापर्यंत पाऱ्याच्या ऑक्सिडाइज्ड स्वरूपाचे प्रत्यक्ष, अणुस्तरावरील निरीक्षण उपलब्ध नव्हते. त्यामुळे शास्त्रज्ञांनी संशोधनासाठी ‘ॲटमॉस्फेरिक प्रेशर केमिकल आयनायझेशन मास स्पेक्ट्रोमेट्री’ या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून आर्क्टिक आणि अंटार्क्टिक प्रदेशातील वातावरणातील पाऱ्याच्या विविध संयुगांचे मोजमाप केले. त्यात आर्क्टिक आणि अंटार्क्टिक या दोन्ही ध्रुवीय प्रदेशांमध्ये ‘मर्क्युरी ब्रोमाइड’ हे संयुग प्रामुख्याने ‘ऑक्सिडाइज्ड’ स्वरूपात असल्याचे आढळून आले. अंटार्क्टिकामध्ये मर्क्युरी क्लोराइड आणि इतर संयुगांचाही शोध लागला.
हे निष्कर्ष आतापर्यंतच्या प्रचलित रासायनिक प्रारूपांशी विसंगत आहेत. कारण, सध्याच्या प्रारूपांमध्ये मर्क्युरी क्लोराइड आणि हायड्रॉक्सी मर्क्युरी ब्रोमाइड ही प्रमुख स्वरूपे मानली जातात. त्यामुळे आतापर्यंत प्रचलित असलेली गृहीतके नव्याने तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
पारंपरिक पद्धतींमध्ये हवेचे नमुने गोळा करून नंतर प्रयोगशाळेत विश्लेषण केले जात असल्याने काही रासायनिक बदल नोंदवले जात नव्हते. मात्र, या नव्या तंत्रामुळे तत्काळ आणि अत्यंत सूक्ष्म पातळीवर संयुगांचे निरीक्षण शक्य झाले. या निष्कर्षांमुळे जागतिक हवामान प्रारूपे, विशेषतः पाऱ्याच्या वहन आणि साठण्याच्या प्रक्रियेविषयीचे अंदाज नव्याने तपासण्याची गरज निर्माण झाली आहे, असे शास्त्रज्ञांनी नमूद केले.
मानवी आरोग्यावरील परिणाम समजून घेण्यासाठी उपयुक्त
अंटार्क्टिका आणि आर्क्टिक या ध्रुवीय प्रदेशाबाबतची नवी, महत्त्वपूर्ण दिशा या संशोधनामुळे मिळाली आहे. त्यामुळे जागतिक प्रदूषण आणि हवामान बदलाच्या अभ्यासात मोठे बदल घडू शकतात. पाऱ्याचे प्रदूषण, त्याचा परिसंस्थांवर होणारा परिणाम आणि मानवी आरोग्यावरचे दीर्घकालीन परिणाम अधिक अचूकपणे समजून घेण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरू शकेल, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.
