पुणे : आर्क्टिक प्रदेशातील वेगाने वितळणारा सागरी बर्फ आणि मोसमी पाऊस यांच्यातील सहसंबंधाचा शोध भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील शास्त्रज्ञांनी नव्या संशोधनातून घेतला आहे. त्यातून आर्क्टिक प्रदेशातील वितळणाऱ्या बर्फामुळे मोसमी पावसाची उत्तरार्धातील (ऑगस्ट, सप्टेंबर) तीव्रता वाढत असून, पावसाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस हा भारतासाठी जीवनवाहिनी आहे. देशाच्या वार्षिक पर्जन्यमानापैकी सुमारे ८० टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात पडतो. शेती, जल व्यवस्थापन आणि अन्नसुरक्षा या दृष्टीने मोसमी पाऊस फार महत्त्वाचा आहे. या अनुषंगाने १९७९ ते २०२२ या कालावधीतील हवामानविषयक निरीक्षणात्मक माहिती आणि हवामान प्रारूपांच्या साहाय्याने आर्क्टिक्ट प्रदेशातील वितळणारे बर्फ, मोसमी पाऊस यांच्यातील सहसंबंधांचा ‘आयआयटीएम’मधील हेमंतकुमार चौधरी, सुबोधकुमार साहा, समीर पोखरेल, अर्चना राय या शास्त्रज्ञांच्या गटाने अभ्यास केला.
या अभ्यासाचा शोधनिबंध ‘ओशन लँड ॲटमोस्फेरिक रीसर्च’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला. या अभ्यासातून आर्क्टिकमधील सागरी बर्फाच्या वितळण्याचा परिणाम मोसमी पावसावर होत असून, विशेषतः जून-जुलैमध्ये आर्क्टिकमध्ये बर्फ कमी झाल्यास ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसावर त्याचा अधिक परिणाम होत असल्याचे संशोधनातून आढळून आले.
तापमानवाढीमुळे आर्क्टिकमधील सागरी बर्फ वितळून पृथ्वीच्या उष्णता समतोलामध्ये बदल होतात. वातावरणात मोठ्या प्रमाणात वाऱ्याच्या आणि दाब प्रणालींमध्ये बदल होतो. आर्क्टिकमधील बर्फ कमी झाल्याने भारताच्या पश्चिम आणि वायव्य भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे मोसमी पाऊस पश्चिमेकडे सरकत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान अशा राज्यांवर त्याचा अधिक प्रभाव पडत आहे. हवामान प्रारूपांच्या विश्लेषणातूनही हा कल स्पष्ट झाला आहे. तसेच मोसमी पावसाच्या उत्तरार्धात त्याची तीव्रता वाढत आहे. अतिपाऊस, कमी कालावधीत जास्त पाऊस अशा घटना घडत आहेत, असे नमूद करण्यात आले आहे. मोसमी पावसाच्या स्थळ-काळात होणारे बदल भविष्यात पुराचा धोका, जलसाठ्यांचे नियोजन, शेतीचे वेळापत्रक आणि अन्नसुरक्षा यावर परिणाम करू शकतात. या अनुषंगाने आर्क्टिकमधील हवामान बदल आणि भारतीय मान्सून यातील संबंध अधिक अचूकपणे समजून घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले.
संशोधनातील लक्षवेधी घटक
- आर्क्टिकमधील सागरी बर्फ वितळल्यामुळे उच्च अक्षांश आणि उष्ण कटिबंधातील तापमानातील तफावत
- आर्क्टिकमधील सागरी बर्फ घटण्यामुळे भारतीय उपखंडावर कमी दाबाच्या प्रणालींसाठी अनुकूल स्थिती
- पश्चिमेकडील राज्ये, संबंधित भागातील पर्जन्यमानात वाढ
- आर्क्टिकमधील सागरी बर्फ वितळण्याचा वेग कायम राहिल्यास मोसमी पावसाचे भौगोलिक वितरण आणि तीव्रता बदलण्याची शक्यता
जागतिक तापमानवाढीमुळे आर्क्टिक्टचा सागरी बर्फ वितळत आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ऊर्जासंतुलन बदलते. आर्क्टिक्ट प्रदेशातील सागरी बर्फ जून–जुलैमध्ये जास्त प्रमाणात वितळल्यास मोसमी पावसाच्या उत्तरार्धात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाची तीव्रता वाढते. पावसाचा पट्टा पश्चिमेकडे सरकत आहे. त्यामुळे मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वीची आर्क्टिक प्रदेशातील स्थिती मोसमी पावसाच्या उत्तरार्धाचा अंदाज वर्तवण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे मोसमी पावसाचा आर्क्टिक्ट प्रदेशातील सागरी बर्फ वितळण्याशी संबंध असल्याचे दिसून येते. याबाबत हवामान प्रारूपांचा वापर करून अधिक सखोल विश्लेषण करण्यात येणार आहे. – हेमंतकुमार चौधरी, शास्त्रज्ञ, आयआयटीएम
