‘ग्रीन थम्ब’ पर्यावरण संस्था व शहर आणि जिल्ह्य़ातील गणेशोत्सव मंडळे यांच्यातर्फे  शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम सुरू आहे. मात्र सध्या खडकवासला किनाऱ्याच्या परिसरात होत असलेली फार्म हाउसेस व बंगले यांच्या अतिक्रमणामुळे या मोहिमेत व्यत्यय येत आहे.
‘ग्रीन थम्ब’ ही पर्यावरण विषयक कार्य करणारी संघटना माजी सैनिकांनी स्थापन केली आहे. या संघटनेद्वारे गेल्या पाच वर्षांपासून शहर व जिल्ह्य़ातील तलावांमधील गाळ, राडारोडा, वाळलेले वृक्ष आदी काढून तलावाची साठवण क्षमता कशी वाढेल यासाठी काम केले जात आहे. त्यासाठी संस्था पाटबंधारे खात्याने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत आहे.
मे महिन्यापासून ‘ग्रीन थम्ब’ व शहर आणि जिल्ह्य़ातील गणेश मंडळे यांच्याकडून संयुक्तपणे शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील गाळ काढण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत एक लाख ट्रक एवढा गाळ काढण्यात आला आहे. मात्र सध्या तलावाच्या परिसरात शासकीय जागांवर ‘फार्म हाऊस’ व ‘बंगले’ यांचे अतिक्रमण वाढल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात येते आहे.
धरण तलावात मोठय़ा भिंती बांधणे, जवळचे डोंगर फोडून, मोठय़ा प्रमाणात मुरूम व राडारोडा टाकणे असे प्रकार होत आहेत. त्यामुळे तलावाचे क्षेत्रफळ व पाणलोट क्षेत्र मोठय़ा प्रमाणात कमी होत आहे. खडकवासला धरणाची मूळ साठवण क्षमता खूप जास्त होती. ती अतिक्रमणे आणि साचलेल्या गाळामुळे सध्या १.७५ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढेच पाणी त्यात साठते. ही साठवण क्षमता वाढवण्यासाठी गाळ काढणे व पाणलोट क्षेत्र विस्तारणे हे आवश्यक आहे, असे ग्रीन थंब यांच्यातर्फे प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या बेकायदा बांधकामांमुळे गाळ काढण्याच्या मोहिमेत मोठय़ा प्रमाणात अडचणी येत आहेत. ही बांधकामे करणारी मंडळी या कामास मोठय़ा प्रमाणावर विरोध करत असून दमदाटी व शिवीगाळ करून कामात व्यत्यय आणत असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले.