पुणे : सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुलाजवळील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमने-सामने आले आहेत. पुलाचे काम पूर्ण झाले असतानाही उद्घाटनासाठी भाजप नेत्यांची वेळ मिळत नसल्याने उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जात नसल्याचा आरोप करत चार दिवसांत पूल वाहनचालकांसाठी खुला न केल्यास त्याचे उद्घाटन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला आहे. तर, उड्डाणपुलावरील रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्या स्थितीमध्ये पूल वाहतुकीसाठी खुला केल्यास त्यावर खड्डे पडण्याचा धोका असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाल्याने राजाराम पूल ते फनटाइम चित्रपटगृह या दरम्यान उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. फनटाइम चित्रपटगृह ते विठ्ठलवाडीपर्यंत हा पूल दुहेरी असून, विठ्ठलवाडीपासून काही मीटर अंतरापासून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी स्वतंत्र उड्डाणपूल आहे. या स्वतंत्र उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, तो तातडीने खुला करावा, अशी मागणी वाहनचालक आणि काही राजकीय पक्षांनी सातत्याने केली आहे. हेही वाचा >>>दुर्धर आजाराने ग्रस्त पत्नीला पतीमुळे जीवनदान! भिन्न रक्तगट असूनही मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी सध्या विठ्ठलवाडी ते राजाराम पूल या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आंदोलन करण्यात आले. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण, महिला शहराध्यक्षा मृणाल वाणी, पोपटराव खेडेकर, गणेश नलावडे, शशीकांत तापकीर, अमोघ ढमाले, अभिजित बारावकर, भक्ती कुंभार यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थि होते. या परिसरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी नागरिकांच्या कररूपी पैशातून उड्डाणपूल उभारण्यात आले आहे. मात्र काही नेत्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, यासाठी हा पूल वाहतुकीसाठी अद्यापही खुला करण्यात आलेला नाही. येत्या चार दिवसांत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला न केल्यास मंगळवारी वाहनचालकांसाठी उड्डाणपूल खुला केला जाईल, असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला. हेही वाचा >>>हे यश माझ्या एकट्याचे नाही; ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याचे मत उड्डाणपुलावरील डांबरीकरणाच्या तिसऱ्या कोटचे काम प्रलंबित आहे. ते काम येत्या आठवड्याभरात पूर्ण होईल. उड्डाणपुलावरून सद्य:स्थितीत वाहतूक सुरू केल्यास त्यावर खड्डे पडण्याचा धोका आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोटे कथानक रचले जात आंदोलन करण्यात येत आहे. त्याला स्थानिक नागरिकांचा कोणताही पाठिंबा नाही.- माधुरी मिसाळ, भाजप आमदार, पर्वती विधानसभा मतदारसंघ