गंभीर, किचकट आणि क्लिष्ट वाटणाऱ्या गुन्ह्यंच्या यशस्वी तपासाची कथा सांगणारे हे सदर..
गंभीर गुन्हा घडल्यानंतर पोलिसांच्या दृष्टीने घटनास्थळावरून अधिकाधिक पुरावे गोळा करणे हे प्राधान्याचे काम असते. कारण घटनास्थळी सापडलेल्या वस्तू, शस्त्रांवरील डाग असे परिस्थितीजन्य पुरावे आरोपीचा माग काढण्यासाठी नेहमीच उपयोगी ठरतात. मे महिन्यात पर्वती टेकडीच्या मागील बाजूस असलेल्या वाघजाई मंदिराजवळ लष्करी जवानाचा खून झाला होता आणि त्या जागी सापडलेल्या मद्याच्या बाटलीमुळे या खुनाचा छडा लागला. पोलिसांचे तपासाचे कौशल्य आणि मद्याच्या बाटलीवर असलेल्या उत्पादन क्रमांकामुळे (बॅच नंबर) मारेक ऱ्यांचा माग पोलिसांना काढता आला.
लष्करातील लान्सनायक संजय लवंगे (वय ३९, मूळ रा. पोफळी, ता. मोताळा, जि. बुलढाणा) हे सिंकदराबादहून २ मे रोजी पुण्यातील दक्षिण मुख्यालयात रुजू झाले. २० मे रोजी त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे त्यांनी आठवडाभराच्या सुटीसाठी अर्ज केला. सुटी मिळाल्यानंतर गावाकडे असलेल्या पत्नी आणि मुलांना भेटायला जायचे त्यांनी निश्चित केले होते. लवंगे यांना लष्करी वाहनाने सकाळी पुणे रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले. गावी जाण्यासाठी रेल्वे रात्री असल्याने दिवसभर काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. फिरत फिरत ते मध्य पुण्यात आले. एका उपाहारगृहात ते गेले होते. तेव्हा एका टेबलवर बसलेला अमित प्रफुल्ल सदनकर (वय २१, रा. रास्ता पेठ) याला त्यांनी पाहिले आणि लवंगे यांनी त्याच्याशी ओळख काढली. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेला सदनकर तसा निर्ढावलेला होता. लवंगेंशी ओळख झाल्यावर ‘बकरा’ हाती लागला, याची जाणीव त्याला झाली. सदनकरने लवंगे यांना दारू प्यायला जाऊ असे आमिष दाखवले. लवंगे यांच्याकडील पैसे संपले होते. त्यामुळे त्यांनी सदनकरला सोबत घेऊन एटीएम केंद्र गाठले. रिक्षातून दोघे जण एटीएममध्ये गेले. त्यावेळी सदनकरने एटीएममधून पैसे काढणाऱ्या लवंगेंच्या खात्यात २७ हजारांची रोकड असल्याचे पाहिले. तेथेच सदनकरच्या मनात काळेबेरे आले. दरम्यान, सदनकर आणि लवंगे दारु प्यायला म्हणून रिक्षातून पर्वतीच्या दिशेने गेले. सदनकरने रिक्षातून जाताना त्याचा मित्र प्रतीक अशोक हाके (वय २३, सध्या रा. नाना पेठ, मूळ रा. जनता वसाहत, पर्वती) याच्या मोबाईलवर संपर्क साधला आणि त्याला नीलायम चित्रपटगृहाजवळ बोलावून घेतले. तेथून ते रिक्षातून सहकारनगर भागातील सारंग कॉर्नर येथे गेले. तेथील एका दारुच्या दुकानातून त्यांनी दारु खरेदी केली आणि रिक्षाचालकाने त्यांना पर्वतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर सोडले.
वाघजाई मंदिर तसा निर्जन परिसर. रात्री साडेआठच्या सुमारास सदनकर, लवंगे, हाके तेथे पोहोचले. मद्यपान झाल्यावर सदनकर आणि हाकेने त्यांना लुटण्याचा कट रचला. दोघांनी लवंगे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. लवंगेंचे एटीएम कार्ड काढून घेतले आणि सांकेतिक क्रमांक विचारला. त्यानंतर दोघांनी तेथून जाणाऱ्या एका मुलाला बोलावले आणि त्याला एटीएममधून पैसे काढण्याची सूचना केली. त्या मुलाला त्यांनी धमकाविले. मात्र, सांकेतिक क्रमांक चुकीचा होता, त्यामुळे पैसे निघाले नाही. हे समजल्यानंतर सदनकर व हाके चिडले. त्यांनी लवंगेंना पुन्हा मारहाण केली आणि त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली घातली. मारहाणीत लवंगे गंभीर जखमी झाले. काही वेळानंतर तेथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी हाके आणि सदनकर तेथून पसार झाले. हाके हा देखील सराईत असल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी तो पुन्हा घटनास्थळी गेला. त्याने जनता वसाहतमधून एका दुचाकीतून पेट्रोल काढले होते. ते पेट्रोल त्याने लवंगेंच्या चेहऱ्यावर ओतले आणि काडीने आग लावली. दुसऱ्या दिवशी वाघजाई मंदिराजवळ एक अनोळखी मृतदेह पडल्याची माहिती तेथील नागरिकांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, गुन्हे शाखेच्या निरीक्षक स्मिता जाधव व तपासपथकातील उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते यांनी घटनास्थळी जाऊन तेथून दारुची बाटली जप्त केली होती.
मृतदेहाचा चेहरा जळालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे ओळख पटलेली नव्हती. मृतदेहाच्या अंगावरील कपडय़ांमध्ये काही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे तपासात अडथळे आले. ओळख पटलेली नसल्याने तपास जवळपास ठप्प होता. मात्र, घटनास्थळावर सापडलेल्या दारुच्या बाटलीवरुन काही धागेदोरे लागतील, अशी शक्यता पोलिसांना वाटत होती. बिअरची बाटलीदेखील फुटलेली होती. त्यावर बॅच क्रमांक होता. त्यामुळे या बॅचच्या बाटल्या कोणत्या दुकानात वितरित झाल्या असतील, या दृष्टीने तपास करण्यास सुरुवात झाली. सातारा रस्त्यावर एका मद्यवितरकाकडून त्या बॅच क्रमांकाची पडताळणी करण्यात आली. तेव्हा त्याने दक्षिण पुण्यासह जवळपास १५ दारुच्या दुकानांची नावे पोलिसांना दिली. पोलिसांनी प्राथमिक तपासात त्या दुकानात जाऊन चौकशी करण्यास सुरुवात केली आणि पोलिसांनी सहकारनगर भागातील दारुच्या एका दुकानावर लक्ष केंद्रित केले. त्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेल्या चित्रीकरणाची पडताळणी पोलिसांनी केली. पोलिसांना काही चित्रीकरण मिळाले. मात्र, ते मारेक ऱ्यांपर्यंत पोचविणारे नव्हते.
खून झालेल्या व्यक्तीची ओळखदेखील पटलेली नव्हती. त्यामुळे तपास पुढे सरकत नव्हता. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी केली त्या वेळी आरोपी सदनकर एका चित्रीकरणात लवंगेंसोबत दिसला. दरम्यान, एका खबऱ्याने पोलिसांना सदनकर व हाके यांच्या संशयास्पद हालचालींची माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरविली आणि दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून लवंगेंचा मोबाईल व एटीएम कार्डही जप्त करण्यात आले. पोलिसांनी त्याआधारे शहानिशा केली. तेव्हा एटीएम कार्डधाराकाचे नाव संजय लवंगे असे असल्याचे निष्पन्न झाले. लवंगे यांच्या मोबाईलची तांत्रिक पडताळणी करण्यात आली. तेव्हा त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून त्यांनी पत्नी आणि सिंकदराबाद येथील एका जवानाशी संपर्क साधल्याचे निष्पन्न झाले. सदनकर व हाके यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी खुनाची कबुली दिली. लवंगे यांच्या पुतण्याला या घटनेची माहिती कळविण्यात आली. त्याने ओळख पटविल्यानंतर लवंगेंचा मृतदेह ताब्यात देण्यात आला. तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, उपनिरीक्षक दत्ताजीराव मोहिते, तानाजी निकम, अशोक गवळी, नवनाथ मोहिते, मनोज कुदळे, नीलेश जमदाडे, महेंद्र राऊत यांनी दिवसरात्र केलेल्या तपासामुळे या गुन्ह्य़ाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.