पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या कामगिरीमुळे चर्चेला आली आहे. जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघातील लष्कराच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. त्यात भारतीय लष्कराच्या खेळाडूंनी जिंकलेल्या २० पदकांपैकी १२ पदके पुण्यातील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’च्या खेळाडूंनी पटकावली. भारतीय संघात ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’च्या २५ खेळाडूंचा समावेश होता. ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, तिरंदाजी, कुस्ती या क्रीडा प्रकारांमध्ये ‘एएसआय’च्या खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली. पदकांच्या कमाईबाबत अनेक ठिकाणी राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली. खेळाडूंची ही सरस कामगिरी ही क्रीडा प्रकाराकडे गांभीर्याने आणि दीर्घ काळापासून सातत्याने प्रयत्न केल्याची फलश्रुती आहे, हे मान्य करावे लागेल.
केंद्र सरकारच्या ‘मिशन ऑलिम्पिक्स’ कार्यक्रमांतर्गत १ जुलै २००१ रोजी पुण्यामध्ये ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’ची स्थापना करण्यात आली. तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, डायव्हिंग, तलवारबाजी, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती या निवडक सात प्रकारांत या संस्थेत उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यात येते. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून प्रशिक्षण दिले जाते. ‘एएसआय’चे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान. खेळाडूंचा केवळ सराव न करून घेता, त्यांच्यासाठी स्पोर्ट्स मेडिसीन, स्पोर्ट्स सायकॉलॉजी (मानसशास्त्र), बायो-मेकॅनिक्स, फिजिओलॉजी आणि तज्ज्ञ न्यूट्रिशनिस्टद्वारे (आहारतज्ज्ञ) वैयक्तिक डाएट प्लॅन्स दिले जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाचे परदेशी व भारतीय प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करतात. नीरज चोप्राने इथून प्रशिक्षण घेऊन ऑलिम्पिक सुवर्ण झेप घेतली आणि ‘एएसआय’चे नाव क्षणार्धात सर्वांच्या तोंडी आले.
क्रीडा प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या खेळाडूंना उच्च प्रतीचे प्रशिक्षण देण्यासाठी देशातील तसेच परदेशातील प्रशिक्षक असतात. या बरोबरच शारीरिक सुदृढ राहण्यासाठी, खेळाडूंसाठीचे विशेष डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ, आहारशास्त्रज्ञ आदींचेही सहकार्य या खेळाडूंना होते. एका प्रकारे परिपूर्ण खेळाडून घडविण्यासाठी या संस्थेत प्रयत्न केले जातात. ऑलिम्पिक्स, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये या संस्थेचे खेळाडू चमकले आहेत. गेल्या २१ वर्षांत ऑलिम्पिकसाठी ३४ खेळाडू या संस्थेने दिले असून, राष्ट्रकुल खेळांमध्ये २२ पदके, आशियाई स्पर्धांमध्ये २१ पदके या संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूंनी पटकावलेली आहेत. याखेरीज राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके या संस्थेतील खेळाडूंनी मिळविली आहेत.
लष्करातील उत्कृष्ट क्रीडापटूंबरोबरच लहान वयोगटातील (८ ते १४ वयोगट) मुला-मुलींच्या निवडीसाठी संस्थेकडून दर वर्षी स्वतंत्र निवडप्रक्रिया राबविली जाते. त्या संदर्भातील जाहिरात संस्थेकडून प्रसिद्ध केली जाते. ‘बॉइज स्पोर्ट्स कंपनीज’ या अंतर्गत मुलांना हे प्रशिक्षण दिले जाते. मुलींसाठी ‘आर्मी स्पोर्ट्स गर्ल्स कंपनी’ लष्कराने दोन वर्षांपूर्वी सुरू केली. तिरंदाजी, ॲथलेटिक्स, बॉक्सिंग आणि वेटलिफ्टिंग या प्रकारांत मुलींना विशेष प्रशिक्षण दिले जाते. या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या मुलींना म्हाऊ येथील ‘आर्मी मार्क्समनशिप युनिट’ आणि पुण्यातील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये प्रशिक्षण दिले जाते. ज्या मुला-मुलींनी जिल्हा, राज्य, शाळा स्तरावर चांगली कामगिरी केली असते आणि खेळाडू म्हणून पुढील प्रशिक्षणासाठी जे पात्र ठरण्याची शक्यता असते, अशांची निवड या प्रक्रियेतून होते. निवड झालेल्या खेळाडूंचे पुढील शालेय शिक्षण आणि क्रीडा शिक्षण ‘एएसआय’मध्येच होते. निवडलेल्या क्रीडाप्रकारात शिखर गाठण्यासाठी सर्व प्रकारचे सहाय्य या संस्थेकडून केले जाते. तसेच, शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर लष्करामध्ये थेट भरतीसाठीही हे खेळाडू पात्र होतात. लष्करामध्ये नॉन कमिशन्ड् अधिकारी आणि ज्युनिअर कमिशन्ड अधिकारी म्हणून भरती होण्याची संधी या खेळाडूंना असते. आता नव्याने सुरू झालेल्या ‘अग्निवीर’ योजनेतही खेळाडूंना संधी असते. ‘बॉईज’ आणि ‘गर्ल्स’ कंपनीचे विशेष म्हणजे या अंतर्गत निवड झालेल्या मुलांना शिक्षण, राहणे, खाणे आणि ऑलिम्पिक दर्जाचे प्रशिक्षण मोफत दिले जाते.
भारतीय लष्कराच्या कठोर शिस्त, उच्च मूल्यांच्या परंपरेत क्रीडा प्रकाराचे स्थानही वरचे आहे. पुण्यातील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’चा वाटा यामध्ये मोलाचा आहे. पद्धतशीर प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन, क्रीडा विज्ञान आणि समर्पित पायाभूत सुविधा विकसित केल्यामुळे देशभरातील विद्यार्थी या ठिकाणी येण्यास उत्सुक असतात. नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये ‘एएसआय’च्या खेळाडूंनी मिळवलेल्या १२ पदकांनी खेळाडूंबरोबरच या संस्थेचेही नाव मोठे झाले. दीर्घ काळापासूनचे उच्च प्रतीचे प्रशिक्षण, उत्कृष्ट प्रशिक्षक यांनी अनेक वर्षे केलेल्या प्रयत्नांचे फळ आता मिळू लागले आहे. देशामध्ये क्रीडाविस्तार होण्यामध्ये पुण्यातील ‘एएसआय’चा वाटा मोठा आहे. खेळाडूंच्या विविध स्पर्धांमधील यशातून ‘एएसआय’ची महत्त्वाची भूमिका अधोरेखित होते.
संस्थेच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळेच या संस्थेला भारताचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. लष्करी शिस्त आणि आधुनिक विज्ञानाचा सुरेख संगम असणारी ही संस्था भारताच्या ऑलिम्पिक स्वप्नांना पंख देण्याचे काम करीत आहे.
prasad.kulkarni@expressindia.com
