पुणे : खासगी प्रवासी बसचे थांबे, अवजड वाहनांची सातत्याने वाहतूक, पदपथांवर अतिक्रमणे, अर्धवट विकासकामे अशा अडथळ्यांच्या शर्यतीत दररोज सुमारे दीड लाख वाहनांची वर्दळ येरवडा परिसरात सुरू असते. त्यामुळे वाहनांच्या गर्दीत येरवडा परिसराचा श्वास कोंडल्यासारखी स्थिती आहे.

येरवडा परिसरातील प्रमुख रस्त्यांची गुरुवारी ‘लोकसत्ता’ प्रतिनिधीने पाहणी केली. त्यामध्ये ही स्थिती आढळून आली. पूर्व-पश्चिम भाग जोडणाऱ्या येरवड्यातील शास्त्री चौक हा वाहतूक कोंडीचे केंद्रबिंदू झाला आहे. या चौकातून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरून अतिमहत्त्वाच्या (व्हीआयपी) व्यक्तींची जा-ये सुरू असते. त्यांचा ताफा आल्यावर वाहतूक थांबविण्यात येते. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

या परिसरात उच्चभ्रू सोसायट्यांपासून आयटी कंपन्या, सरकारी आणि खासगी संस्थांची कार्यालये, शाळा-महाविद्यालये, धार्मिक स्थळे, पंचतारांकित हाॅटेल्स, माॅल्स आहेत. त्यातच दाट वस्तीचा भागही आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

रस्त्यालगत बस

पुण्यातून नगर रस्त्याने मराठवाडा, विदर्भात जाणाऱ्या खासगी प्रवासी बस या मार्गाचा वापर करतात. बंडगार्डन, येरवडा, चंदनगर, खराडी, वाघोली ते बायपासपर्यंत खासगी प्रवासी बसची कार्यालये आणि थांबे आहेत. रस्त्याच्या दुतर्फा या बस उभ्या असतात. प्रवाशांना सोडण्यासाठी आलेली वाहनेही थांबत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

शास्त्री चौकात सतत कोंडी

पूर्व-पश्चिम भाग जोडणाऱ्या येरवड्यातील शास्त्री चौक मुख्य आहे. या चौकातच येरवडा पोलीस आणि विमानतळ वाहतूक पोलीस ठाणी आहेत. कल्याणीनगर, विमानतळ, नागपूर चाळ, गोल्फ कोर्स आणि गुंजन चित्रपटगृह या परिसरातील रस्ते याच चौकात एकत्र येतात. सीसीटीव्ही, वाहतूक नियंत्रण दिवे असतानाही वाहनचालकांकडून या चौकात उलट्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांचे प्रमाण जास्त आहे.

पदपथांवर अतिक्रमणे

या रस्त्यावर बीआरटी मार्ग होता. तो काढून टाकण्यात आला आहे. काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, पदपथांवर अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी दुरुस्तीच्या कामांमुळे रस्त्यालगत लोखंडी अडथळे उभे करण्यात आले असून, ‘पीएमपी’चे थांबे मागे गेल्याने प्रवाशांना रस्त्यावर येऊन बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.

नागरिक काय म्हणतात?

वाहतूक पोलिसांनी नगर रस्त्यावरील येरवडा ते खराडीपर्यंत सर्व रस्ते बंद करून दूरवर ‘यू-टर्न’ तयार केले आहेत. मात्र, हे करताना शास्त्रीनगर, रामवाडी, भाभानगर, श्रीराम साेसायटी, नागपूर चाळ किंवा इतर परिसरातील स्थानिकांना विचारात घेतलेले नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणेही कठीण झाले आहे. रात्रीच्या वेळी शास्त्री चौकात खासगी बस आणि वाहनांची मोठी गर्दी असल्याने वाहतूक कोंडी होत आहे, असे या परिसरातील नागरिक प्रमोद देवकर म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या परिसरातील नगर रस्त्यावरून दररोज ७५ हजार मोठी वाहने, खुळेवाडीतून १८ हजार वाहने आणि पूर्वेकडे जाणारी ८५ हजार अशी सुमारे दीड लाख वाहनांची वर्दळ सुरू असते. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या मार्गावरून जात असल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. खासगी बसचालकांना वाहने उभे करण्यास मज्जाव करण्यात आला असून, रस्ता रुंदीकरण सुरू आहे. दिवस-रात्र ३८ पोलीस कर्मचारी काम करत आहेत. पूर्वीपेक्षा वाहतूक कोंडी कमी झाली असून, रुंदीकरण झाल्यावर वाहतूक सुरळीत होईल.- रवींद्र कदम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विमाननगर वाहतूक पोलीस स्थानक.