अनेक युवक सध्या व्हॉटसप, फेसबुकला स्टेटस ठेवून हवा करण्याच्या प्रयत्नात असतात. मात्र, अशा तरुणांना धडा शिकवण्याचं काम कायद्याचे रक्षक बरोबर करत असतात. असंच एक उदाहरण आता समोर येत आहे. पिस्तुल घेऊन फोटो, व्हिडिओ काढून ते स्टेटसला ठेवणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे आणि या ऑनलाईन भाईंना वेसण घातली आहे.

विनापरवाना पिस्तुल बाळगणाऱ्या दोन तरुणांना गुंडाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही तरुण पिस्तुल घेऊन व्हिडिओ बनवायचे. आणि ते सोशल मीडियावर टाकायचे. मात्र पोलिसांनी कारवाई करत या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

आरशान शकिर शेख वय- 25 आणि उमेर जाकीर शेख वय- 21 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल हस्तगत केले आहे. ही कारवाई आकुर्डी परिसरात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी रामदास कुंडलिक मोहिते यांनी फिर्याद दिली आहे.

पिस्तुलासोबत व्हिडिओ काढून हिरोगिरी करणाऱ्या दोन तरुणांना गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. यांनी फिल्मीस्टाईल व्हिडिओ बनवून तो व्हॉटसपला स्टेट्स म्हणून ठेवला होता. याची माहिती गुंडा विरोधी पथकापर्यंत पोहचली. त्यानुसार, या दोघांना ते राहत असलेल्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. तेव्हा, त्यांच्याकडे पिस्तुल आढळले, तसेच त्यांच्या मोबाईलमध्ये पिस्तूलासोबत काढलेले फोटो आणि व्हिडिओ देखील निदर्शनास आले आहेत.

दरम्यान असे प्रकार सोशल मीडियावर आढळल्यास नागरिकांनी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे. ज्या व्यक्तीने माहिती दिली असेल त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असं त्यांनी म्हटलं आहे.