पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा गैरव्यवहार (टीईटी) प्रकरणात सायबर गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. या प्रकरणात अटक केलेल्या दोघा आरोपींनी अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी आरोपी स्वप्नील पाटील तसेच संतोष हरकळ यांना पैसे दिल्याचे तपासात उघड झाले आहे. कलीम गुलशेर खान (वय ५२, रा. हनुमान मंदिर, बुलढाणा), राजेंद्र विनायक सोळुंके (वय ५२, रा. नांदगाव, जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय गोविंद जगताप यांनी गैरव्यवहार प्रकरणात सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

स्वप्नील पाटील याने दलालांमार्फत १५० अपात्र उमेदवारांची माहिती मिळवली होती. त्याने अपात्र उमेदवारांची यादी दलाल संतोष हरकळ याच्याकडे दिल्याचे तपासात उघडकीस आले होते. राजेंद्र सोळुंकेने ४० अपात्र उमेदवारांना पात्र करण्यासाठी पाटील याला पैसे दिले होते तसेच यादीही दिली होती. आरोपी कलीम खानने राज्यातील ६५० अपात्र उमेदवारांची यादी आरोपी हरकळ याला दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. खान याने एक कोटी रुपये हरकळ याला दिल्याचे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपी खान, सोळुंके यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने दोघांना सात एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.