पुणे : कात्रज भागात क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गाेळीबार करून पसार झालेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. तेजस महादेव खाटपे (वय २३, रा. श्रीराम मंदिराशेजारी, आंबेगाव बुद्रुक, कात्रज), तुषार धनराज चव्हाण (वय २४, रा. सच्चाईमाता रस्ता, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

कात्रज भागात २० मार्च रोजी क्रिकेट खेळताना तरुणांच्या दोन गटात वाद झाला होता. आरोपी आकाश पवार, रोहन पवार, तुषार माने, तुषार चव्हाण, दादा चव्हाण, तेजस खाटपे, स्वरुप राठोड, गजानन माने यांनी पिस्तुलातून गोळीबार करून दहशत माजविली. आरोपी तेजस खाटपेने ऋषीकेश बर्डे याच्यावर कोयत्याने वार केले. या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली होती. आरोपी तेजस आणि तुषार पसार झाले होते.

हेही वाचा – पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले…

हेही वाचा – ‘बारामती’साठी खडकवासल्यात मोर्चेबांधणी, महायुतीचा फौजफाटा सात दिवस राखीव ठेवा; अजित पवारांची सूचना

पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी कात्रज भागात सापळा लावून पकडले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी पराजे-वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने, सहायक निरीक्षक समीर कदम, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, विक्रम सावंत, राहुल तांबे, आदींनी ही कारवाई केली.