Baramati Krushik 2026 / बारामती : कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून शेतीमध्ये अमुलाग्र बदल करता येतात, त्याचे प्रत्यंतर आता येऊ लागले आहे. राज्यात या तंत्रज्ञानाचा वापर ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत असताना, आता अन्य पिकांच्या उत्पादनासाठीही ‘एआय’चा वापर केला जाऊ लागला आहे. तुरीच्या लागवडीतून एका एकरात सहा महिन्यांत उत्पादन घेण्यात आले आहे. याबराेबरच भाजीपाला, फळबागा; तसेच कांद्यापासून कापूस, एरंड, मका या पिकांसाठी ‘एआय’चा वापर वाढल्याने शेतकऱ्यांना उत्पादनाची हमी मिळू लागली आहे.

बारामतीच्या ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेल्या कृषिक प्रदर्शनात सुमारे दीड लाख शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. कोकण, मराठवाड्यातूनही हजारो शेतकरी या प्रदर्शनास दररोज भेट देत आहेत. यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने घेतलेली ऊस, भाजीपाला, फळबागा; तसेच कांद्यापासून कापूस, एरंड, मका, तुरीपर्यंतची पिके या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

गोदावरी या जातीच्या तुरीचे पीक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून घेतल्यास काय होते हे या प्रदर्शनातून दाखवून देण्यात आले. येथील लागवड केलेल्या तुरीच्या एका रोपाला तब्बल तीन हजारापर्यंत शेंगा आढळून आल्या. शिफारशीनुसार या तुरीच्या लागवडीची आखणी केल्यास एका एकरात सहा महिन्यांत उत्पादन आणि त्यानंतर तीन महिन्यांत खोडव्याचे उत्पादन मिळून कमाल ४० क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येते. याबाबतची माहिती या प्रदर्शनात देण्यात येत आहे.

नवे तंत्रज्ञान स्वीकारताना शेतकरी अनुत्साही असतात, मात्र एकरी १० हजार रुपये खर्च असलेल्या कृत्रिम बुध्दीमत्तेचा शेतीतील प्रयोग राज्यातील १० हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे. आता या प्रकारच्या शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे.

बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने राज्याच्या विविध जिल्ह्यांत प्रथमच १० हजार शेतकऱ्यांच्या शेतात कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रयोग करण्यात आला. आता त्यापैकी अडीच हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या उसाची तोडणी झाली. त्यामध्ये ज्या ठिकाणी एकरी सरासरी ४० टनांपेक्षा अधिक उसाचे उत्पादन मिळत नव्हते, तेथे उत्पादनाची सरासरी ८० टनांवर पोचल्याचे आढळून आले. आता एकरी २०० टनांचा प्रयोग करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रात प्रयोग करण्यात येत आहे.

सध्याचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आहे. शेतीत ‘एआय’ हे संकट नाही, तर संधी असेल. त्याचा उपयोग शेतकऱ्यांनी करून घ्यायला हवा. – राजेंद्र पवार, प्रमुख, ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती</strong>