समाजासाठी काही करण्याची इच्छा असलेली व्यक्ती आपल्या वयाकडेही दुर्लक्ष करते आणि कार्यरत राहते. असेच एक कार्यकर्ते अरविंद शिराळकर. वयाच्या पंचाहत्तरीनंतरही त्यांची समाजाबरोबर चांगली नाळ जुळलेली असल्याने वंचित, विद्यार्थी, दृष्टिहीन अशा विविध घटकांसाठी ते काम करतात. श्रीराम ओक यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद.
सामाजिक कार्यातील प्रेरणास्थान कोण होते?
माझे वडील संघशिक्षक असल्यामुळे माझ्यावर संघविचारांचे संस्कार झाले. सन १९७४ च्या सुमारास सुहासिनी आपटे (आत्ताच्या विनया मेहेंदळे) यांच्याशी वस्ती पातळीवर काम करण्याबाबत चर्चा झाली आणि नवी पेठेतील घराजवळील ‘ज्योरी प्लाॅट’ या वस्तीत कामाला प्रारंभही झाला. तेथील मुलांना शिकविण्याचे काम केले.
कमिन्समधील नोकरी झाली, की संध्याकाळी पाच वाजता वस्तीत जायचे, असा शिरस्ता होता. दोन वर्षांनी आम्हाला महापालिकेच्या शाळेत संध्याकाळच्या वेळासाठी चार खोल्याही मिळाल्या आणि मग आमचे शैक्षणिक कार्य अधिक जोमाने सुरू झाले. आम्ही त्या वस्तीत ठरवल्याप्रमाणे दहा वर्षे शिकवले. पुढे वस्तीतील मुलांनी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन हे कार्य पुढे सुरू करायचे ठरवले आणि आम्हीही त्यांच्याकडे १९८६ मध्ये हे कार्य सुपूर्द केले.
त्यानंतर आपले कार्य कसे सुरू होते?
वस्तीतील कामानंतर कमिन्सजवळील अंध शाळेतील कार्याचा प्रारंभ झाला. दहावीतील विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ पुस्तके तयार करून देण्याचे काम सुरू करण्याचे ठरले, त्याला एका लेखानंतर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि त्यातून अंधमित्र संस्थेचा जन्म झाला. आम्ही पाचवी ते दहावी या वर्गांसाठी अभ्यासाच्या १६० कॅसेटचा एक संच, असे १९ संच तयार केेले. अर्थात या सगळ्या कार्यासाठी आर्थिक आणि मनुष्यबळाचे पाठबळ मुबलक मिळाल्यामुळेच आम्ही हे करू शकलो.
कौस्तुभ गद्रे, वैशाली आठवले अशी किती तरी नावे घेता येतील, ज्यांची मला या कार्यात मदत झाली. आम्ही हे सर्व संच १९ शाळांना भेट दिले. आमच्या कार्यासाठी मिळणाऱ्या प्रतिसादानंतर आमची उमेद वाढत होती. आम्ही या मंडळींसाठी विविध स्पर्धा, ब्रेलमधील पुस्तकांचे ग्रंथालय असे विविध उपक्रम केले.
क्रीडा प्रकारांत आपण केलेले कार्य कोणते?
मी शाळेकडून मल्लखांब, कबड्डी खेळायचो. अनेक बक्षिसेही पटकावली. मात्र, महाविद्यालयात मी बुद्धिबळ खेळण्यास प्रारंभ केला. दहा-दहा तास मी बुद्धिबळ खेळत असे. बीएस्सीनंतर कमिन्स इंडियामध्ये नोकरी आणि ती सांभाळून स. प. महाविद्यालात बुद्धिबळ शिकवणे असे सुरू होते. त्या वेळी माझी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतही निवड झाली. आम्ही महिलांच्या बुद्धिबळ स्पर्धा पुण्यात घेण्यास सुरुवात केली.
निवृत्तीनंतर पुढे काय करायचे ठरवले होते?
कमिन्समध्येही माझ्या हातून सेवाकार्य घडले. दृष्टिहीन बांधवांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. नोकरीतून बाहेर पडल्यानंतरही माझे स्नेही प्रसन्न आणि शुभदा जोशी यांच्यासाठी ‘कॅडकॅमगुरू’ या त्यांच्या शैक्षणिक संस्थेसाठी सामाजिक कार्य करू लागलो. तेथेच आम्ही ‘गुरूमंत्र’ ही संस्था सुरू केली. येथे आम्ही अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग डिझाइन शिकवतो आणि त्यांना नोकऱ्या मिळतील यासाठी प्रयत्नही करतो.
सामाजिक क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना काय सांगाल?
आयुष्यात माणसाला खूप काही करण्यासारखे असते. कधी संधी असते, पण वेळ नसतो, तर काही वेळेला आवडही नसते. कोणत्याही सामाजिक कार्याला घरातूनही तेवढेच पाठबळ आवश्यक असते. माझी पत्नी आरती हिने संधिवातासारख्या आजाराने त्रस्त असूनही माझ्या कामात कधी आडकाठी न करता कायमच प्रोत्साहन दिले. तसेच, माझा मोठा भाऊ रविदादा यानेही सेवाकार्यासाठी पाठबळ दिले. समाजासाठी थोेडे जरी काही करण्याची इच्छा असेल, तर ते आवर्जून आणि मनापासून करावे. ते कार्य छोटे का मोठे हे पाहू नये.
shriram.oak@exprssindia.com

