नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा गुन्हा

पुणे : आर्यन खान प्रकरणात अमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून (एनसीबी) पंच करण्यात आलेल्या किरण प्रकाश गोसावी (वय ३७, रा. वाशी, नवी मुंबई) याला पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गुरुवारी अटक केली आहे.

मुंबईतील क्रुझ पार्टीत अटकेतील आर्यन खान याच्या सोबतचे छायाचित्र समाजमाध्यमांत प्रसारित झाल्यापासून गोसावी चर्चेत आला होता.

कात्रजमधील मांगडेवाडी भागातील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतची माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. अपर पोलीस आयुक्त डॉ. रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे त्या वेळी उपस्थित होते.परदेशात नोकरीच्या आमिषाने तरुणाला तीन लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी किरण गोसावी याच्याविरुद्ध  पुण्यातील  फरासखाना पोलीस ठाण्यात  फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.या प्रकरणी पुणे पोलिसांनी यापूर्वी त्याची मैत्रीण  शेरबानो मोहम्मद इरफान कुरेशी (वय २७, रा. गोवंडी, मुंबई) हिला अटक केली आहे. त्यानंतर गोसावी    विरुद्ध लुकआउट नोटीस   प्रसृत करण्यात आली होती. 

त्याचा  शोध घेण्यासाठी तीन पथके मागावर होती. गोसावी लखनौ येथे असल्याची माहिती मिळाल्यावर पुणे पोलिसांचे पथक तेथे पोहोचले  होते. मात्र, पोलीस पाठलाग करीत असल्याची माहिती मिळताचे त्याने तेथूनही पळ काढला होता. या दरम्यान तो वेगवेगळय़ा प्रसारमाध्यमांशी प्रतिक्रिया देत होता. त्यानुसार पोलिसांनी पुन्हा त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.

बुधवारी (२७ ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास किरण गोसावी कात्रज परिसरात   असल्याची माहिती खंडणीविरोधी   पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने   सापळा रचून त्याला अटक केली.

तीन वर्षांपासून फरार

आर्यन प्रकरणात समीर वानखेडे यांनी पंच केलेला किरण गोसावी याने परदेशात नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तरुणाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण तीन वर्षांपूर्वीचे आहे. तेव्हापासून तो या प्रकरणात फरार होता.