आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावीचा पाय अजून खोलात, पुण्यात तीन गुन्हे दाखल!

किरण गोसावीविरोधात पुण्यात फसवणुकीचे अजून दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याच्याविरोधातील दाखल गुन्ह्यांची संख्या आता तीन झाली आहे.

Kiran Gosavi remanded in police custody for 8 days
किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे

एनसीबीनं छापा टाकून आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याच्यासोबत सेल्फी काढणारा आणि या कारवाईत पंच म्हणून भूमिका पार पाडणारा किरण गोसावी अजूनच अडचणीत आला आहे. त्याच्यावर पुण्यामध्ये एकूण तीन गुन्हे दाखल झाले आहेत. किरण गोसावीने आर्थिक फसवणूक केल्याची पहिली तक्रार दाखल झाल्यानंतर त्याला अटक करून ८ दिवसांच्या पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली होती. पण तोवर त्याच्या विरोधात अजून दोन गुन्हे दाखल झाल्यामुळे त्याचा पाय अजूनच खोलात गेल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचा छापा म्हणजे बनावट प्रकार असल्याची टीका सातत्याने केली आहे. तसेच, किरण गोसावीवर देखील त्यांनी आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर किरण गोसावी चर्चेत आला होता. दोन दिवसांपूर्वी किरण गोसावी पुण्यात पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि पोलीस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली. पण त्यानंतर आता त्याच्या विरोधात अजून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

किरण गोसावी ८ दिवसांच्या पोलीस कोठडीत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरी लावून देतो, असं सांगून पुण्यातील एका तरुणाची आर्यन खान ड्रग्स प्रकरणी पंच राहिलेल्या किरण गोसावीने आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी गुरुवारी पहाटे त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पण त्याच्या काही तासांतच त्याच्यावर लष्कर आणि वानवडी पोलिस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे किरण गोसावी विरोधात एकूण एकूण तीन गुन्हे दाखल झाल्याने किरण गोसावीचा पोलीस कोठडीतला मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात फरासखाना पोलिस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक राजेंद्र लांडगे म्हणाले की, “कसबा पेठ परिसरात राहणारा चिन्मय देशमुख या तरुणाला मलेशियात नोकरी लावून देतो असे किरण गोसावीने सांगितले. त्यासाठी एकूण तीन लाख रुपये घेण्यात आले. त्या दरम्यान तो तरुण मलेशियात गेला. पण तिथे गेल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, तो तरुण पुण्यात परतला. त्यानंतर त्याने किरण गोसावी विरोधात फसवणुकीची तक्रार २०१८ च्या दरम्यान फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये दिली.

पुण्यात फसवणुकीचे अजून दोन गुन्हे दाखल

या प्रकरणी त्याचा तपास सुरू असतानाच आर्यन खान प्रकरणात किरण गोसावीचा फोटो प्रसार माध्यमांमध्ये आल्यावर पुन्हा चिन्मय याने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. त्याच्यासोबत काम करणारी महिला सहकारी हिला ताब्यात घेण्यात आले. त्याच दरम्यान २८ तारखेला पहाटेच्या सुमारास कात्रज येथील लॉजवरून किरण गोसावीला ताब्यात घेऊन न्यायालयामध्ये हजर केले. त्यानंतर आज वानवडी आणि लष्कर पोलिस स्टेशनमध्ये आर्थिक फसवणुकीचे अजून दोन गुन्हे त्याच्याविरोधात दाखल झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aryan khan drugs case cheating case against kiran gosavi panch in pune pmw

Next Story
राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्षपदासाठी काकडे, निकम, पाटील यांची चर्चा
ताज्या बातम्या