पुणे : काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या वर्षी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महापालिकेत नोकरी मिळाली आहे. या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जगदाळे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला राज्य सरकारच्या सेवेत नोकरी देण्याची आश्वासन देण्यात आले होते. मात्र मागील अकरा महिन्यापासून यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता.
काश्मीरमधील पहलगाम येथे पुण्यातील संतोष जगदाळे आणि त्यांचे कुटुंबिय गेल्या वर्षी एप्रिल २०२५ मध्ये फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी झालेल्या दहशतवादी हल्लात जगदाळे यांनी आपला जीव गमावला होता. दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमोर जात आणि धर्म विचारून गोळीबार केला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. विविध स्तरातून हळहळ व्यक्त केली जात होती. या हल्ल्यात देशातील विविध भागातील २६ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये जगदाळे हे एक होते.
पहलगाम दुर्घटनेनंतर जगदाळे कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. पती गमावल्याने प्रगती जगदाळे आणि पिता गमावल्याने आसावरी यांच्यावर कोसळलेल्या दुःखाच्या प्रसंगी, शिंदे यांनी या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी आसावरीला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रशासकीय प्रक्रियेत काही काळ विलंब झाला असला, तरी उपमुख्यमंत्र्यांनी पुणे महापालिका आयुक्तांशी थेट संवाद साधून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
या घटनेनंतर गेल्या वर्षभरापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या जगदाळे कुटुंबाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महानगरपालिकेत शासकीय सेवेत वर्ग-२ (प्रशासकीय अधिकारी) पदाची नोकरी दिली आहे. पुणे महापालिकेत महापौर मंजुषा नागपूरे आणि सभागृह नेते गणेश बिडकर आणि आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत आसावरी जगदाळे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आसावरीचे फोनवरून शुभेच्छा देत अभिनंदन केले.
‘विशेष बाब’ म्हणून वर्ग-२ पद मिळाले
आसावरी जगदाळे यांनी संगणक शास्त्रात पदवी आणि मानव संसाधन व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या उच्च शिक्षणाचा विचार करून, त्यांच्या पात्रतेनुसार पुणे महानगरपालिकेत समकक्ष पद निर्माण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, महापालिका स्तरावर वर्ग-३ किंवा वर्ग-४ ची पदे भरण्याचे अधिकार असतात, मात्र राज्य सरकारने आसावरी यांच्यासाठी विशेष बाब म्हणून वर्ग-२ (प्रशासकीय अधिकारी) पदाला मंजुरी देण्याचे निश्चित केले आहे.
