पिंपरी : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज (१२ एप्रिल) निधन झाले आहे. आशा भोसले यांचे पिंपरी-चिंचवड शहराशी वेगळे नाते होते. आशाताई यांनी पिंपरी-चिंचवड शहराला मोठे केले. त्यांनी शहराला नावलौकिक दिला आहे. अजरामर केले आहे. देशपातळीवर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या संगीतकारांना आशाताई भोसले यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या नावाने २२ वर्षांपासून पुरस्कार दिला जातो, अशी आठवण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी सांगितली.
‘भारताच्या सांगीतिक क्षेत्राचा श्वास म्हणजे लतादीदी आणि ऊच्छवास म्हणजे आदरणीय आशाताई. संगीत क्षेत्र आणि चित्रपटसृष्टीवर अनेक दशके आपल्या आवाजाची जादू कायम ठेवत आशाताईंनी सर्वांना एक अनोखी ऊर्जा दिली. त्यांच्या अलौकिक स्वरांनी आणि साधनेने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेच, पण या सांगीतिक प्रवासात त्यांनी अनेकांचे आयुष्यही घडवले’.
‘मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की, मला आशाताईंचा प्रदीर्घ काळ कौटुंबिक सहवास लाभला. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना त्यांच्या नावाने गेल्या २२ वर्षांपासून पुरस्कार प्रदान करण्याचे भाग्य मला लाभले, हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा बहुमान आहे.
आशाताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वय आणि त्यांच्या उत्साहाचा कधीही संबंध आला नाही. त्यांचा आवाज ‘चिरतरुण’ होता आणि त्या स्वतःही शेवटपर्यंत मनाने तरुणच राहिल्या.
माझ्यासारख्या कोणत्याही सांगीतिक पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीला त्यांनी समाजात एक नवीन ओळख, प्रतिष्ठा आणि कार्य करण्याची ऊर्जा दिली. एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचूनही माणूस म्हणून जमिनीवर पाय ठेवून कसे जगावे, ही महत्त्वाची शिकवण त्यांनी आपल्या आचरणातून दिली.
माझ्यासाठी त्या केवळ एक महान गायिका नव्हत्या, तर मातेसमान असलेल्या मार्गदर्शक आणि मैत्रिणीप्रमाणे साथ देणाऱ्या ‘नायिका’ होत्या. अशा या थोर गायिकेला आणि माझ्या आदरणीय आशाताईंना मी मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो’, असे भाऊसाहेब भोईर म्हणाले.
‘आशाताई भोसले यांचे जाणे हे ऐकणे अत्यंत कठीण आहे. त्या आपल्यातून जाऊ कशा शकतात असे वाटते. आशाताई यांनी
पिंपरी-चिंचवड शहराला मोठे केले. त्यांनी नावलौकिक दिला आहे. अजरामर केले आहे. आशा भोसले पुरस्कार देण्यास त्यांनी मला परवानगी दिली. २२ वर्षे मला त्यांचा सहवास लाभल्याचे’ भोईर यांनी सांगितले.
