पुणे : स्वरमंचावरून सदाबहार गीतांचे सादरीकरण होत असताना चित्र आणि शिल्पाचा अनोखा कोलाज सोमवारी संगीतप्रेमी रसिकांनी अनुभवला. बालगीत, प्रणयगीत, द्वंद्वगीत, आनंदी, विरहाची, उडत्या चालींची अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आशा जागविणाऱ्या गीतांच्या सादरीकरणाची ‘आशा द होप’ ही अनोखी मैफल दिवसभर रंगली.

पूना गेस्ट हाऊस स्नेहमंचच्या वतीने ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना अभिवादन करण्याच्या उद्देशातून सलग बारा तास त्यांनी लोकप्रिय केलेल्या गीतांचा आनंद घेत रसिकांनी कलाकारांच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद दिली. यामध्ये सत्तरहून अधिक गीते सादर करण्यात आली. सांगीतिक मैफल सुरू असताना सुरेश राऊत यांनी आशा भोसले यांची शिल्पकृती साकारली. तर राहुल मिसाळ यांनी कुंचल्याच्या फटकाऱ्यांनी जलरंगातील आशाताईंचे व्यक्तिचित्र रेखाटले.

ईशानी हिंगे यांनी सादर केलेल्या ‘मागे उभा मंगेश’ या गीताने सुरुवात झाली. अमर यांनी बासरी वादनातून ‘मालवून टाक दीप’ आणि ‘जीवलगा राहिले रे दूर घर माझे’ या गीतांच्या सुरावटींनी समारोप झाला. त्यांना अनिरुद्ध पंडित यांनी तबला साथ केली. अनुराधा पटवर्धन, मनीषा निश्चल, रामेश्वरी वैशंपायन, कल्याणी देशपांडे, मोनाली दुबे, राधिका अत्रे, वैजू चांदवले, संगीता बादरायण, डॉ. रोहिणी काळे, तुषार पिंगळे, मयूर पांडे, डॉ. अनघा गुमास्ते, सोनिया बालपांडे, डॉ. राजीव जोशी, संजय जोग, विवेक जडे, जितेंद्र भुरूक, ॲड. रुचिरा गुरव, रवींद्र शाळू, संजय मरळ, अजय राव, प्रीती पेठकर यांनी ‘ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर’, ‘का रे दुरावा’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘इशारों इशारों में’, ‘एक मैं और एक तू’, ‘नैंनोमे दर्पण है’, ‘ये राते ये मौसम नदी का किनारा’, ‘पिया बावरी’, ‘यही वो जगह है’, ‘जाईये आप कहा जाऐंगे’, ‘अच्छा जी मै हारी’, ‘अभी ना जाओं’, ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’, ‘झुमका गिरा रे’ ही गीते सादर करण्यात आली. डॉ. भाग्यश्री कश्यप यांनी निवेदन केले. अनिरुद्ध पंडित यांचे एकल तबला वादन रसिकांची दाद मिळवून गेले. डॉ. प्रसाद पिंपळखरे यांनी आशाताईंच्या गाण्यांविषयी आठवणी सांगितल्या. प्रसिद्ध संगीत संयोजक विवेक परांजपे यांनी मंगेशकर कुटुंबियांसमवेतचा सांगीतिक प्रवास उलगडला. पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार आणि अजित कुमठेकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.