पुणे : ‘रूपे्री पडद्यावर पाहिलेल्या सूर्यकांत यांच्यासमवेत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळामध्ये काम केले आणि आम्ही स्नेही झालो,’ अशी आठवण वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सांगितली. हा धागा पकडून ‘त्यावेळी चित्रपट महामंडळात राजकीय हस्तक्षेप नव्हता. आता सांस्कृतिक क्षेत्रात राजकीय नेत्यांचा अभिनय आणि अभिनिवेश वाढला आहे,’ अशी टिप्पणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी केली.

ही शाब्दिक जुगलबंदी रंगली ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांडरे यांच्या जन्मशताब्दी सांगतेनिमित्त पूना गेस्ट हाऊस आणि प्रकाश मांडरे आयोजित विशेष कार्यक्रमात. ज्येष्ठ नेते उल्हास पवार, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कवयित्री प्रतिभा शाहू मोडक, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे आणि लीला गांधी, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, प्रकाश मांडरे आणि किशोर सरपोतदार या वेळी उपस्थित होते.

‘अवघ्या १३ वर्षांची असताना मी सूर्यकांत यांना प्रथम पाहिले, तेव्हा भारल्याप्रमाणे झाले होते. त्यावेळी मी आशा काळे नव्हते तर, रावसाहेब काळे यांची मुलगी होते. सूर्यकांत आणि उषा किरण यांच्यावरील गीताचे चित्रीकरण मी गगनबावडा येथे पाहिले होते. काही काळाने रूपेरी पडद्यावर मी त्यांची नायिका होईन, असे स्वप्नातही वाटले नव्हते. सूर्यकांत यांच्यासारख्या कलाकारासोबत काम करण्याची संधी मिळाली, हा मला भाग्ययोग वाटतो, अशी कृतज्ञ भावना ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केली.

काळे म्हणाल्या, ‘भालजी पेंढारकर यांच्या ‘तांबडी माती’ या चित्रपटात मी सूर्यकांत यांची नायिका झाले. नंतरही अनेक चित्रपटांत आम्ही भूमिका केल्या. ‘गनिमी कावा’ चित्रपटात एक प्रेमगीत चित्रित करण्यासाठी मला गजरा हवा होता, ती मागणी सूर्यकांत यांनी पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परिवेषात ते उभे राहिले, की साक्षात महाराजांची ऊर्जा पोचल्यासारखे वाटत असे.’

लीला गांधी म्हणाल्या, ‘‘प्रीतीसंगम’ या चित्रपटाच्या वेळी सूर्यकांत यांच्याशी पहिली भेट झाली. ते प्रसंग छान समजावून सांगत असत. प्रत्येकाला सांभाळून घेण्याची वृत्ती आणि खेळीमेळीचे वातावरण, हे त्यांचे वेगळेपण होते.’

मांडरे यांच्या नातसून युगंधरा मांडरे आणि सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले. सुरेश राऊत यांनी सूर्यकांत यांचा अर्धपुतळा साकारला. सूर्यकांत यांच्या चित्रपट कारकिर्दीवर आधारित ध्वनीचित्रफित सुरुवातीला दाखवण्यात आली. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात सूर्यकांत यांच्या गाजलेल्या चित्रपटांतील लोकप्रिय गीते पल्लवी आनदेव, प्रा. रवींद्र शाळू यांनी सादर केली. संहितालेखन सुलभा तेरणीकर यांचे होते.