scorecardresearch

स्वातंत्र्यानंतर आमच्या हाती काय आले? ; अंगणवाडी आणि आशा सेविकांचा मोर्चाद्वारे सवाल

या अभियानाचा भाग म्हणून बुधवारी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली.

स्वातंत्र्यानंतर आमच्या हाती काय आले? ; अंगणवाडी आणि आशा सेविकांचा मोर्चाद्वारे सवाल
सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणे धरले.

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांना कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या. तसा दर्जा मिळेपर्यंत त्यांना सध्या मिळणारे मानधन किमान वेतनाएवढे करा अशी मागणी करत शेकडो महिलांनी बुधवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ‘स्वातंत्र्याचं झालं काय – आमच्या हाती आलं काय?’ अशा घोषणा देऊन या सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात धरणे धरले.

राष्ट्रीय एकात्मता समितीतर्फे ‘ऑगस्ट क्रांती सप्ताह जन की बात’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा भाग म्हणून बुधवारी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली. अंगणवाडी कर्मचारी सभेचे अध्यक्ष नितीन पवार आणि आशा वर्कर्स युनियनचे अध्यक्ष श्रीमंत घोडके यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांमध्ये देशात सर्व प्रकारची वंचितता वाट्याला आलेल्या घटकांचे प्रमाण मोठे आहे. त्यातील एक महत्त्वाचा घटक अंगणवाडी ताई आणि आशा सेविका आहेत. ग्रामीण भाग आणि वाड्या-वस्त्यांवर तीन ते सहा वर्ष वयातील बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण, पोषण आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण, स्तनदा मातांना आहार अशा अनेक आरोग्य योजनांचे यश या सेविकांच्या योगदानावर अवलंबून आहे. मात्र त्यांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. म्हणून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आपल्या कामाला प्रतिष्ठा आणि किमान वेतन मिळावे अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात आली. आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि महिला बालविकास कार्यालयाच्या उपायुक्त नयना बोरुडे यांना देण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या