गेल्या दोन वर्षांत करोनाच्या संकटानंतर यंदा प्रथमच आषाढीचा पायी वारी सोहळा होणार आहे. दोन वर्षे आषाढीला एसटी बसने संतांच्या पादुका पंढरपुरात नेल्या जात होत्या. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आषाढी पायी वारीसाठी २१ जून रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल.
यंदा सोहळ्यात तिथीची वृध्दी झाल्याने लोणंदमध्ये अडीच दिवस, तर फलटणमध्ये दोन दिवस पालखी सोहळा मुक्कामी राहील. दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार यंदापासून संस्थानच्या सही-शिक्क्याने वाहन पास दिले जातील, अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे-पाटील यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आषाढी वारी पायी दिंडी पालखी सोहळा नियोजनाची बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस श्रीमंत उर्जितसिंह शितोळे, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त डॉ अभय टिळक, नामदेव महाराज वासकर, राणू महाराज वासकर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्थ माउली जळगावकर, दिंडी समाजाचे अध्यक्ष भाऊ महाराज गोसावी, सचिव मारुती कोकाटे, बाळासाहेब रंदवे, भागवत चवरे, भाऊ फुरसुंगीकर, सोपानकाका टेंबुकर, गुरुजीबुवा राशिनकर, शरद गायकवाड, बाळासाहेब उकळीकर, व्यवस्थापक माउली वीर, सह व्यवस्थापक श्रीधर सरनाईक यांच्यासह दिंडी प्रमुख व फडकरी उपस्थित होते.

आषाढी पायी पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आणि मुक्काम

मंगळवार, २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवेल. बुधवार, २२ व गुरुवार, २३ जून पुणे, शुक्रवार, २४ व शनिवार, २५ जून सासवड, रविवार २६ जून जेजुरी,
सोमवार, २७ जून वाल्हे,
मंगळवार, २८ व बुधवार,
२९ जून लोणंद,
गुरुवार, ३० जून तरडगांव,
शुक्रवार, १ व शनिवार, २ जुलै फलटण, रविवार, ३ जुलै बरड,
सोमवार, ४ जुलै नातेपुते,
मंगळवार, ५ जुलै माळशिरस
बुधवार, ६ जुलै वेळापूर,
गुरुवार ७ जुलै भंडीशेगाव,
शुक्रवार, ८ जुलै वाखरी, तर शनिवार ९ जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपुर येथे पालखी सोहळा मुक्कामी पोहोचेल.
रविवार, १० जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण, तर पुरंदावडे ( सदशिवनगर ), पानीव पाटी, ठाकूरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashadhi ekadashi 2022 waari schedule announced pune print news scsg
First published on: 13-04-2022 at 13:04 IST