पुणे : वारकऱ्यांची लगबग, पांडुरंग-वासुदेवाच्या वेशातील भाविक, झांजा आणि तुळशीमाळा विकणारे वारकरी, वारकरांच्या वेशातील लहानगे… टाळ-मृदंगाचा निनाद, भजन-कीर्तन नि विठूनामाच्या गजराने भक्तिमय झालेला परिसर.. अशा वातावरणात भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या, तर नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी पुणेकरांनी शुक्रवारी रांगा लावल्या. दर्शनासाठी आलेल्या प्रत्येकाच्या मनाशी ‘सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती’ हा तुकोबांच्या अभंगातील भाव जडलेला दिसला.

शुक्रवारी पहाटे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांची काकड आरती, अभिषेक आणि महापूजा करण्यात आली. त्यानंतर दोन्ही मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली. पहाटेपासूनच हजारो भाविकांनी कुटुंबीयांसह रांगा लावून पादुकांचे दर्शन घेतले. मंदिर परिसरात ज्ञानोबा माउली तुकाराम, माउली-माउली या जयघोषांनी वातावरण भारावले होते. वारकऱ्यांच्या प्रत्येक दिंडीत हरिपाठ, भजन-कीर्तन शुक्रवारी दिवसभर सुरू होते. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह आलेल्या महिला, महाविद्यालयीन युवक-युवती ज्ञानोबा-तुकोबाच्या दर्शनासाठी मोठ्या उत्साहात घराबाहेर पडले. तर, परराज्य, विदेशातून आलेले विद्यार्थी-पर्यटकांनी पालखीचा आनंदसोहळा प्रथमच अनुभवला.

वारकऱ्यांच्या दिंड्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत मुक्कामांच्या ठिकाणी आणि मंदिर परिसरात भजन-कीर्तन, अभंग आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले. भजन-कीर्तनाबरोबरच झिम्मा, फुगडी, यांसारखे पारंपरिक खेळ खेळत महिलांनी या सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. दरम्यान, गर्दीच्या नियोजनासाठी पोलिसांकडून विशेष व्यवस्था करण्यात आली. अनेक ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात आले होते. तर, दर्शनासाठी आलेल्यांना स्वयंसेवकांकडून सहाय्य करण्यात येत होते.

आरोग्य शिबिरे, कलाकार दिंडी; वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी भोजनसेवा

शहरातील विविध संस्था-संघटनांच्या वतीने पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात आलेल्या वारकऱ्यांची विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच आरोग्य शिबिरे, नेत्र तपासणी आदी माध्यमातूनही पुणेकरांनी वारकऱ्यांची सेवा केली.‘आदर फाउंडेशन’ने आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन केले. या शिबिरात २०० हून अधिक डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना औषधोपचार, दंत तपासणी, फिजिओथेरपी, सांधेदुखीवरील सल्ला आणि आयुर्वेद विषयक मार्गदर्शन आदी आरोग्यसेवा दिली. शांतिलाल सुरतवाला मित्र परिवार, रंगीलदास सुरतवाला ट्रस्ट आणि आचार्य आनंदऋषीजी पुणे ब्लड सेंटर यांच्या वतीने वारकऱ्यांना साडेचार हजार चष्मे मोफत देण्यात आले. स्त्रियांना साडीचोळी, पुरुषांना शर्ट, रेनकोट, चप्पलचे वाटप करण्यात आले.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने कलाकार दिंडीचे आयोजन करण्यात आले. फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजतर्फे वाहतूक पोलिसांसाठी रेनकोटचे वाटप करण्यात आले.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, संस्कार भारती पश्चिम प्रांत, पुणे पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेतर्फे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी लाल महालात सलग १२ तास अखंड कीर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने २७ हजार वारकऱ्यांची आरोग्य, नेत्र तपासणी करण्यात आली. तर वारकऱ्यांना ११ हजार ५०० चष्म्यांचे वाटप करण्यात आले.लकडी पूल विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, सुफी वारकरी विचार मंच, अवामी महाज, दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक आणि महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, औषध वाटप आणि सर्वधर्मीय ऐक्य दिंडी आदी उपक्रम राबवण्यात आले. तसेच, डॉ. पी. ए. इनामदार युनिव्हर्सिटीच्या वतीने वारकऱ्यांना दैनंदिन वापराच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

अखिल भारतीय मजदूर काँग्रेस, श्री सत्ताविसा जैन सिटी ग्रुप, कृष्णाई युवा मंच, प्रियदर्शनी शिक्षण संस्था, कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठान, बहुजन विकास आघाडी, पोलीस मित्र संघटना, सोनाली ग्रुप, रोटरी क्लब ऑफ पुणे साउथ,सद्गगुरूनाथ श्रीकाका महाराज सेवा परिवार आदी संघटनांच्या वतीने वारकऱ्यांसाठी चहा-नाष्ता, भोजन यांसह विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. दरम्यान, पालखी सोहळ्यानिमित्त अक्षर दिंडीच्या वतीने पसायदान, अभंग-ओव्या आणि हरिनामाची आकर्षक मांडणी, संविधान-आरोग्य-पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येत आहे.