पुणे : विठ्ठलनामाचा गजर करत शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रत्येक पाऊल ही श्रद्धेची परीक्षा असते. दुर्गम गावांतून आलेले अनेक वारकरी अनवाणी किंवा साध्या चपला घालून दररोज सुमारे २० किलोमीटर पायपीट करतात. या प्रदीर्घ प्रवासामुळे तळपायांना फोड, जखमा, सूज, चिखल्या, त्वचेचे विकार आणि तीव्र वेदना अशा अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागते. त्यातून दिलासा देण्यासाठी पुण्यात श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मुक्कामस्थळी सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक गुरुवारी सरसावले. पाय धुण्यापासून जखमांवर मलमपट्टी व औषधोपचार करण्यापर्यंतची सेवा देत, विठुरायाच्या भेटीस निघालेल्या या वारकऱ्यांच्या पावलांना नवसंजीवनी देण्याचे काम यंदाही भक्तिभावाने केले गेले.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुण्यातील विविध सामाजिक संस्था, सार्वजनिक गणेश मंडळे आणि स्वयंसेवी संस्था दर वर्षी पुढाकार घेतात. नाना पेठ, भवानी पेठ, रास्ता पेठ आदी पालखी मार्गावरील भागांत हजारो वारकरी मुक्कामासाठी दाखल होताच त्यांच्या पायांवरील उपचारांसाठी विशेष सेवा केंद्रे उभारली जातात. यंदाही अनुभवी मसाज तज्ज्ञ, स्वयंसेवक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी औषधी तेलाने वारकऱ्यांच्या पायांना मसाज केला. फोड व जखमांवर मलमपट्टी करून आवश्यकतेनुसार औषधेही दिली. अनेक ठिकाणी पाय स्वच्छ धुणे, निर्जंतुकीकरण आणि अल्प विश्रांतीचीही व्यवस्था करण्यात आली.
‘साखळीपीर तालीम मंडळाच्या वतीने वारकऱ्यांच्या पायांना मसाज, चप्पल दुरुस्ती, केशकर्तन अशा अनेक सुविधा दिल्या जातात. त्याचप्रमाणे औषधोपचारासाठी डॉक्टरांचे पथक असते,’ अशी माहिती साखळीपीर तालीम मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर यांनी दिली.
चाळीस वर्षे सेवा करणारे हकीम
आषाढी वारी म्हणजे केवळ श्रद्धेचा प्रवास नाही, तर सेवाभावाचाही उत्सव आहे. या सेवाभावाचे जिवंत उदाहरण म्हणजे हैदराबादचे ८० वर्षीय अब्दुल रझाक. गेली तब्बल ४० वर्षे ते दर वर्षी केवळ वारकऱ्यांच्या पायांची निगा राखण्यासाठी पुण्यात दाखल होतात. वारीला निघण्यापूर्वी अनेक दिवस विविध औषधी वनस्पतींपासून तयार केलेले विशेष औषधी तेल ते कॅन भरून घेऊन येतात. वारकऱ्यांच्या पायांना रझाक आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मसाज पद्धतीने आराम देतात. त्यांच्या उपचारांमुळे वेदना कमी होतात आणि पुढील प्रवासासाठी वारकऱ्यांना नवसंजीवनी मिळते, असा अनुभव वारकऱ्यांनी सांगितला.

पाय थकले, वय ८७ वर्षांचे झाले, पण अजूनही वारी करतो. गावाकडे जमीन असली, तरी ती आता पडीक आहे, कसायलाही कोणी नाही. शहरात आल्यावर दोन दिवस रेल्वे स्थानकावर काढले. आता भवानी पेठेतच थांबलो आहे. इथून पुढे पंढरपूरपर्यंत जाणार. पायाला चिखल्या झाल्या आहेत. दर वर्षी त्रास होतो. मात्र पुण्यात चांगला मसाज मिळतो, उपचारही होतात. त्यामुळे पायांत ताकद राहते, असे हिंगोलीहून आलेले वारकरी रेशमाजी खराटे सांगतात.


लातूरच्या जानकाबाई युवराज लोखंडे म्हणतात, गेली २५ वर्षे वारी करत आहे. आता वय ८० च्या घरात आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कंबरदुखीचा त्रास होत असल्याने सगळे अंतर चालवत नाही. थोडे चालणे आणि थोडा ट्रकमधून प्रवास, अशी वारी सुरू आहे. कंबरदुखीसाठी रात्री झोपण्यापूर्वी तेलाने हलक्या हाताने मसाज केला जातो, त्यामुळे जरा आराम पडतो.
