पुणे : आषाढी वारीनिमित्त वारकरी, भाविकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. वारी मार्गात दर पाच किलोमीटर अंतरावर प्रथमोपचार सुविधा, औषधसाठा आणि रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुणे, सातारा, सोलापूर आणि पंढरपूर परिसरात वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, प्रथमोपचार केंद्रे, रुग्णवाहिका सेवा, औषधसाठा, मनुष्यबळ नियोजन आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. बैठकीला सहसंचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर, उपसंचालक धूम, पुणे विभागाचे उपसंचालक भगवान पवार, तसेच पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतील वरिष्ठ आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक आणि १०८ रुग्णवाहिका सेवेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
काटकर म्हणाले, ‘वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून, सेवाभावाची संधी आहे. प्रत्येक वारकऱ्याला आपुलकीने आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. वारी काळात सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक यांच्यासाठीही आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या. वारी मार्गावरील आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांना ‘आरोग्यदूत’ म्हणून कार्यरत करावे.’
वारी मार्गावरील प्रमुख मुक्कामस्थळी उष्माघात, निर्जलीकरण, पायांच्या जखमा तसेच संसर्गजन्य आजारांवर तातडीने उपचार करण्यासाठी विशेष वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसादासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
