पुणे : आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना पुणे जिल्हा आरोग्य विभागाच्या तयारीला वेग आला असून, यंदा प्रथमच आळंदी ते निरा या वारी मार्गावर वारकऱ्यांसाठी विशेष अतिदक्षता विभाग (आयसीयू) सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भातील प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला असून, त्याला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे वारीदरम्यान गंभीर रुग्णांना तातडीची आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गांवर वारकऱ्यांसाठी कायमस्वरुपी अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी एक आराखडा तयार केला असून, त्यात अतिदक्षता विभागांची माहिती, ठिकाणे, आवश्यक कुशल मनुष्यबळ, उपकरणे आणि यासाठीची आवश्यक आर्थिक तरतूद यांची माहिती देण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील पालखी मार्गांवर ११ रुग्णालये, ४० प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४७ उपकेंद्रे आहेत. यापैकी १२ उपकेंद्रांमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्याविषयी जिल्हा आरोग्य विभागाने जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. पालखी मार्गावर दर दोन किलोमीटर अंतरावर उपकेंद्रात अतिदक्षता विभाग सुरू करण्याची तयारी जिल्हा आरोग्य प्रशासनाने हाती घेतली आहे.
हवेली ,दौंड, बारामती, पुरंदर, इंदापूर या पाच तालुक्यांतील १२ उपकेंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात फुरसुंगी, वाल्हा निरा, लोणी काळभोर, उरुळी कांचन, वरवंड, केडगाव, काटेवाडी, बिजवडी, परिंचे, होळ आणि नीरवांगी या उपकेंद्रांमध्ये वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी अतिरिक्त विभाग सुरू करणे नियोजित आहे. या अतिदक्षता विभागात प्रत्येकी पाच खाटा असतील. एका अतिदक्षता विभागासाठी सुमारे ४९ लाख रुपयांप्रमाणे १२ अतिदक्षता विभागांसाठी पाच कोटी ८८ लाख ३३ हजार ६०० रुपये इतका खर्च प्रस्तावित आहे. साहित्य आणि उपकरणांशिवाय कुशल मनुष्यबळाचीही मागणी करण्यात आली असून, यामध्ये भूलतज्ज्ञ, फिजिशियन, डॉक्टर्स, परिचारिका, परिचर यांचा समावेश असणार आहे.
चौकट
वारीमध्ये प्रथमच आरोग्य सेवेचे ‘गूगल मॅपिंग’
यंदा आरोग्य विभागाने वारीसाठी प्रथमच ‘गूगल मॅपिंग क्यूआर-कोड’ तयार केला आहे. यामध्ये आपल्या जवळ असणारा आरोग्य विभाग अथवा आरोग्य केंद्र, रुग्णवाहिकेची उपलब्धता, डॉक्टरांचे नाव, त्यांचा मोबाईल क्रमांक त्वरित उपलब्ध होणार आहे.
- आषाढी वारीसाठी पुणे विभागात १०० आरोग्य दूत
- १०८ सेवेच्या १७६ रुग्णवाहिका, तर १०२ (कार्डियाक) सेवेच्या १२३ रुग्णवाहिका
- प्रत्येक वारकऱ्यांसाठी प्रथमोपचार संच
- यंदा प्रथमच वारकऱ्यांना जीवनसत्त्व ‘अ’ डोस आणि जंतनाशक गोळ्यांचे वाटप
- पालखी मार्गांवर १७६ फिरती आरोग्य पथके
- खासगी रुग्णालयात वारकऱ्यांसाठी १० टक्के खाटा आरक्षित
- कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी धूर फवारणी
वारकऱ्यांच्या सोयीसाठी यंदा प्रथमच आळंदी ते निरादरम्यान १२ अतिदक्षता विभाग सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. हे अतिदक्षता विभाग कायमस्वरुपी असून, यामुळे वारकऱ्यांना आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मिळेल.तर दर दोन किलोमीटर अंतरावर त्याची सोय असणार आहे. पंढरपूरमध्ये वीस खाटांचा अतिदक्षता विभाग असून, त्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातही ही सुविधा प्रस्तावित आहे. ती कार्यान्वित होण्यास विलंब होणार नाही.
- डॉ. रामचंद्र हंकारे, पुणे जिल्हा आरोग्य अधिकारी
