पुणे : जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघातील लष्कराच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. त्यात भारतीय लष्कराच्या खेळाडूंनी जिंकलेल्या २० पदकांपैकी १२ पदके पुण्यातील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या खेळाडूंनी पटकावली आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला एकूण ८५ पदके मिळाली. भारतीय संघात आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटच्या २५ खेळाडूंचा समावेश होता. ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, तिरंदाजी, कुस्ती या क्रीडा प्रकारांमध्ये एएसआयच्या खेळाडूंनी लक्षणीय कामगिरी केली. ॲथलेटिक्समध्ये सहा पदके मिळाली. गुलवीर सिंगने १,५०० मीटर आणि १०,००० मीटरमध्ये रौप्यपदक, तर ५,००० मीटरमध्ये कांस्यपदक मिळवून तीन स्पर्धांत तीन पदकांची कमाई केली. सावन बरवालने मॅरेथॉनमध्ये रौप्यपदक मिळवले. त्याच्या या कामगिरीमुळे या स्पर्धेत भारतीय पदकाची ४४ वर्षांची प्रतीक्षा संपवत त्याने राष्ट्रीय विक्रमाचीही नोंद केली. सर्वेश कुशारेने उंच उडीमध्ये रौप्यपदक मिळवले. या प्रकारात भारताला तब्बल ५६ वर्षांनंतर पदक मिळाले. धर्मवीर हा कांस्यपदक मिळवणाऱ्या पुरुषांच्या ४× ४०० मीटर रिले संघाचा सदस्य होता. बॉक्सिंगमध्ये सुभेदार अंकुशने सुवर्णपदक मिळवले, तर सुभेदार नरेंदर आणि हवालदार कपिल यांनी कांस्यपदके पटकावली. तिरंदाजीमध्ये धीरजने सांघिक आणि मिश्र सांघिक अशा दोन्ही प्रकारांत दोन रौप्यपदके मिळवली. त्याने ७२० पैकी ६९८ गुण मिळवत आशियाई विक्रमही प्रस्थापित केला. कुस्तीमध्ये सुभेदार दीपक पुनियाने ९७ किलो वजनी गटातील फ्रीस्टाइल प्रकारात कांस्यपदक मिळवले.
‘क्रीडा हा भारतीय लष्कराच्या शिस्त, सहनशक्ती आणि उत्कृष्टतेच्या संस्कृतीचा दीर्घकाळापासून अविभाज्य भाग राहिला आहे. ‘मिशन ऑलिम्पिक्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून लष्कराने प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करण्यासाठी सातत्याने गुंतवणूक केली आहे. पुण्यातील ‘आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट’मध्ये पद्धतशीर प्रशिक्षण, तज्ज्ञ मार्गदर्शन, क्रीडा विज्ञान आणि समर्पित पायाभूत सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. ‘एएसआय’च्या खेळाडूंनी मिळवलेली १२ पदकांची ही कामगिरी म्हणजे खेळाडू, प्रशिक्षक आणि सहायक कर्मचाऱ्यांनी अनेक वर्षे केलेल्या केंद्रित प्रयत्नांचे फलित आहे. प्रशिक्षण आणि क्रीडा पायाभूत सुविधांमध्ये लष्कराने केलेल्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे रूपांतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदकविजेत्या कामगिरीत करण्यात ‘एएसआय’ची महत्त्वाची भूमिका असल्याचे या यशातून अधोरेखित होते,’ अशी माहिती ‘एएसआय’कडून देण्यात आली.
