विज्ञानाबरोबरच संस्कारांचे बीजारोपण, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा जपणारी ‘आसमंत बेनेव्होलन्स फाऊंडेशन’ ही संस्था. या संस्थेच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षांपासून पुण्याबरोबरच कोकण, गोवा आणि मुंबई येथे विविध उपक्रम राबविण्यात येतात. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नंदकुमार पटवर्धन यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद…

‘आसमंत’ या नावामागे प्रेरणा काय होती ?

आसमंत म्हणजे आकाश. आकाशाला जशा सीमा नाहीत, तसेच सामाजिक कार्यालाही कोणत्याही एका चौकटीत किंवा कक्षेत बंदिस्त करता येत नाही, अशी आमची भूमिका आहे. म्हणूनच ‘आसमंत’ हे नाव आम्हाला भावले. लहान मुलांचा सर्वांगीण विकास, भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार आणि अभ्यासक व रसिकांची नवी पिढी घडविणे, तसेच पर्यावरण आणि निसर्गाचे रक्षण व संवर्धन अशा विविध क्षेत्रांत संस्थेचे कार्य विस्तारले आहे.

संस्थेमार्फत कार्य नेमके कसे चालते?

आमच्या दृष्टीने शिक्षण म्हणजे केवळ माहिती मिळविणे नव्हे; तर जिज्ञासा जागृत होण्याचा आणि स्वतः अनुभवातून शिकण्याचा प्रवास आहे. या भूमिकेतून आम्ही विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांशी सामंजस्य करार केले आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षणाची संधी मिळते. विविध विषयांवरील कार्यशाळा, शिष्यवृत्ती, संदर्भग्रंथांची भेट, प्रयोगशाळांसाठी आवश्यक उपकरणांचे साहाय्य आणि संयुक्त संशोधन प्रकल्प अशा अनेक माध्यमांतून विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या पलीकडील जगाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्याने प्रश्न विचारावा, स्वतः निरीक्षण करावे, प्रयोग करावा आणि त्यातून निष्कर्षापर्यंत पोहोचावे, याला आम्ही विशेष महत्त्व देतो.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी आपण काय करता?संगीत हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही; ते मन घडविणारे आणि संवेदनशीलता विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात कलेचे स्थान महत्त्वाचे आहे, असे आम्हाला वाटते. भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा जतन करणे, त्याचा अभ्यास आणि संशोधनाला चालना देणे आणि नव्या पिढीमध्ये या संगीताची अभिरुची निर्माण करणे, या उद्देशाने संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जातात.

नवोदित कलाकारांना व्यासपीठ देतानाच अनवट, दुर्मीळ किंवा क्वचित सादर होणाऱ्या रागांचे सादरीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न असतो. कलाकाराला सादरीकरणाची संधी आणि रसिकांना काहीतरी वेगळे ऐकण्याचा आनंद या दोन्हींचा सुंदर संगम त्यातून साधला जातो. कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रोत्यांची मिळणारी उत्स्फूर्त दाद कलाकाराचा आत्मविश्वास वाढवते आणि कलाकार व रसिक यांच्यात अभिरुचीचे, आपुलकीचे नाते निर्माण होते. या मैफलींचे ध्वनिचित्रमुद्रण समाजमाध्यमांद्वारे दर महिन्याला अनेक रसिकांपर्यंत पोहोचवले जाते.

निसर्गसंवर्धनाच्या क्षेत्रात आपण वाटा कसा उचलला आहे ?

निसर्गाचे संवर्धन करायचे असेल तर केवळ झाडे लावणे पुरेसे नाही; निसर्गातील परस्परसंबंध समजून घेणे आणि संपूर्ण परिसंस्थेचे रक्षण करणे आवश्यक आहे. याच विचारातून जैवविविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून हवेचे शुद्धीकरण, स्थानिक तापमानाचे नियमन, पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत आणि असंख्य कीटक, फुलपाखरे, पक्षी तसेच अन्य जीवांसाठी सुरक्षित अधिवास निर्माण करणे, हे उद्दिष्ट आहे.

समुद्राविषयी समाजात आदर, कुतूहल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, या उद्देशाने ‘सागर महोत्सव’ हा उपक्रम सुरू केला. गेल्या पाच वर्षांत या उपक्रमाने एक चळवळीचे स्वरूप घेतले आहे. देशातील नामवंत वैज्ञानिक, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ, कोकण कृषी विद्यापीठ, एस एन डी टी, गोगटे, फर्ग्युसन आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालये तसेच विविध प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. विज्ञान केवळ प्रयोगशाळेत घडत नाही; ते निसर्गाच्या सान्निध्यात, निरीक्षणातून आणि प्रत्यक्ष अनुभवातूनही घडते.

आपल्या सर्व उपक्रमांच्या केंद्रस्थानी कोणता विचार आहे ?

आसमंतच्या प्रत्येक उपक्रमामागे एक समान सूत्र आहे, ते म्हणजे ज्ञानाला संस्कारांची जोड, संस्कारांना कृतीची दिशा आणि कृतीला समाजहिताची प्रेरणा.

बालकांना ज्ञान देताना त्यांच्यात संवेदनशीलता निर्माण व्हावी, कलाकारांना व्यासपीठ देताना अभिरुची आणि संस्कृतीचा वारसा पुढे जावा आणि निसर्गाचे संवर्धन करताना जैवविविधतेबद्दल समाजाच्या मनात जिव्हाळा निर्माण व्हावा या विचारांनी आमचे कार्य सुरू आहे. या वाटचालीत सातत्य, उपक्रमशीलता आणि नव्याचा शोध हे आमचे आधार आहेत. त्याद्वारे परिवर्तनशीलतेला पाठबळ मिळते आहे, याचा आम्हाला आनंद आहे.
shriram.oak@expressindia.com