पुणे : ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’चा (जीएमआरटी) वापर करून ८-९ अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या दीर्घिकांमधील अणुरूपी हायड्रोजनद्वारे उत्सर्जित होणाऱ्या सरासरी रेडिओ सिग्नलचा शोध भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी लावला आहे. कॉसमॉस क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकाशाच्या एका भागातील आठ अब्ज वर्षांपूर्वीच्या दीर्घिकांमधील सरासरी अणुरूपी हायड्रोजनचे प्रमाण मोजणारा हा केवळ दुसराच शोध असून, या संशोधनाने या पूर्वीच्या संशोधनाच्या निष्कर्षांची पुष्टी केली आहे.

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राने (एनसीआरए) या संशोधनाबाबतची माहिती दिली. आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका), राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रातील बलप्रीत कौर, निस्सिम काणेक, आदित्य चौधरी, जयराम चेंगलूर यांचा या संशोधनात सहभाग आहे. संशोधनाचा शोधनिबंध ‘द ॲस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. अणुरूपी हायड्रोजन हे तारानिर्मितीसाठीचे प्राथमिक इंधन आहे. विश्वाच्या उत्क्रांतीमध्ये दीर्घिका कशा विकसित होतात हे समजून घेण्यासाठी तारे, दीर्घिकांमधील वायू या दोन्हींच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यासाठी विश्वाच्या कालरेषेतील वेगवेगळ्या टप्प्यांवर दीर्घिकांमधील तारे आणि अणुरूपी हायड्रोजन या दोन्हींचे वस्तुमान मोजणे गरजेचे आहे. विश्वाच्या इतिहासात ८ ते १० अब्ज वर्षांपूर्वीचा काळ हा तारानिर्मितीच्या सर्वाधिक घडामोडींचा काळ मानला जातो. आठ अब्ज वर्षांपूर्वीच्या सर्वोच्च पातळीनंतर विश्वातील तारानिर्मितीचा वेग एवढ्या झपाट्याने का कमी झाला, हा खगोलशास्त्रातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. दीर्घिकांतील अणुरूपी हायड्रोजनचे प्रमाण हायड्रोजन अणूद्वारे अंदाजे २१ सेमी तरंगलांबीवर उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ सिग्नलचे निरीक्षण करून मोजले जाते. याला एचआय २१ सेमी सिग्नल म्हणतात. रेडिओ दुर्बिणीचा वापर करून या सिग्नलचा शोध घेता येऊ शकतो.

‘आयुका’तील शास्त्रज्ञ बलप्रीत कौर म्हणाल्या, ‘जीएमआरटी’चा वापर करून कॉसमॉस क्षेत्राचे २०० तासांपेक्षा अधिक काळ निरीक्षण करण्यात आले. ‘एचआय’ २१ सेमी स्टॅकिंग तंत्राद्व्रारे सुमारे १० हजार दीर्घिकांचे रेडिओ ‘एचआय’ २१ सेमी सिग्नल्स एकत्रित केले. त्यानंतर दीर्घिकांमधील सरासरी अणुरूपी हायड्रोजनचे प्रमाण मोजण्यात आले. त्यातून असे दिसले, की आजच्या दीर्घिकांच्या तुलनेत सुरुवातीच्या दीर्घिकांमध्ये खूप जास्त प्रमाणात अणुरूपी रूपातील वायू होता. तसेच त्यांचा तारानिर्मितीचा वेगही सध्याच्या दीर्घिकांच्या तुलनेत खूप जास्त होता. तारानिर्मितीच्या प्रक्रियेत दीर्घिका त्यांच्याकडील वायूचा खूप वेगाने वापर करतात. जर या दीर्घिकांनी त्यांच्या सभोवतालच्या वातावरणातून आणखी वायू मिळवला नाही, तर त्यांच्याकडील तारानिर्मितीचे इंधन संपुष्टात येईल असे निदर्शनास आले. गेल्या आठ अब्ज वर्षांत विश्वातील तारानिर्मितीचा वेग का कमी झाला, याचे सरळ स्पष्टीकरण यातून मिळते.’

कॉसमॉस दीर्घिकांच्या अणुरूपी हायड्रोजनच्या गुणधर्मांना त्यांच्या इतर गुणधर्मांशी आणि वातावरणाशी जोडण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. कॉसमॉसमधील दीर्घिकांमधून सरासरी एचआय २१ सेमी सिग्नल शोधणे हे या काळातील वैयक्तिक दीर्घिकांचा सिग्नल मोजण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. असे या पूर्वी कधीही झालेले नाही. त्यामुळे आता जीएमआरटीद्वारे कॉसमॉस क्षेत्राचे आणखी सखोल निरीक्षण करण्यात येत असल्याचे प्रा. जयराम चेंगलूर यांनी नमूद केले.

‘एचआय’ २१ सेमी रेडिओ सिग्नल्सचा शोध आव्हानात्मक का असतो?

‘आठ अब्ज वर्षांपूर्वीच्या युवा विश्वातील दीर्घिकांमधील अणुरूपी हायड्रोजनचे प्रमाण मोजण्यासाठी अत्यंत दूरवरच्या दीर्घिकांमधून येणारे हे सिग्नल्स शोधणे आवश्यक असते. हे सिग्नल्स आपल्यापर्यंत पोहोचायला अब्जावधी वर्षे लागतात, त्यामुळे आपण त्या दीर्घिका जशा अब्जावधी वर्षांपूर्वी होत्या तशाच पाहत आहोत. हे एचआय २१ सेमी सिग्नल्स मुळातच अत्यंत क्षीण असतात आणि त्याच रेडिओ फ्रिक्वेन्सीवर मानवनिर्मित रेडिओ सिग्नल्सचा मोठा अडथळा असल्याने त्यांचा शोध आव्हानात्मक असतो,’ अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.