विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी टोरँटोपाठोपाठ लंडन येथील महाराष्ट्र मंडळानेही मराठी सारस्वतांना हुलकावणी दिली असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षीदेखील विश्व साहित्य संमेलन अनिश्चित काळासाठी रद्द झाले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारकडून निधी मिळण्याविषयी साशंकता असल्यामुळेच हे संमेलन संयोजकांनी रद्द केले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुण्यामध्ये कार्यालय आल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक शनिवारी झाली. त्यानंतर महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी लंडन येथील महाराष्ट्र मंडळाने असमर्थता दर्शविल्यामुळे विश्व साहित्य संमेलन रद्द झाले असल्याची माहिती पत्रकारांना दिली. प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन या प्रसंगी उपस्थित होते.
विश्व साहित्य संमेलनासाठी लंडन येथील एकमेव निमंत्रण आले होते. मात्र, संयोजकांनी असमर्थता दर्शविल्यामुळे हे संमेलन रद्द करण्यात आले आहे. अर्थात सलग दुसऱ्या वर्षी रद्द झाल्यामुळे हे संमेलन कायमस्वरुपी रद्द होणार नाही. महामंडळाच्या सुधारित घटना दुरुस्तीनुसार किमान तीन वर्षांतून एकदा विश्व साहित्य संमेलन होणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील वर्षी हे संमेलन निश्चित होईल, असा आशावाद डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारकडून युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यासंदर्भात आलेल्या प्रस्तावाला महामंडळाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. याविषयी सरकारशी चर्चा करून अंतिम निर्णय जुलैमध्ये घेण्यात येणार आहे. मराठी शाळांची घटती संख्या रोखण्यासाठी घटक संस्था जगजागृतीबरोबरच अहवाल सरकारला सादर करणार आहे. महामंडळाने केलेले शुद्धलेखनाचे सुलभ नियम लवकरच राज्य सरकारला सादर करण्यात येतील, असेही वैद्य यांनी सांगितले.
संमेलनाचा निर्णय १४ जुलैला
आगामी ८७ व्या साहित्य संमेलनासाठी सासवड आणि िपपरी-चिंचवड येथून निमंत्रणे आली आहेत. साहित्य महामंडळाची स्थळ निवड समिती १३ जुलै रोजी दोन्ही ठिकाणांना भेटी देणार आहे. त्यानंतर १४ जुलै रोजी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा होईल, असेही डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.

लोणावळ्यात दरीतून चालण्याचा घ्या आनंद